पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी नाकारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी नाकारली
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी नाकारली

पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी नाकारली

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : पतीपेक्षा लाखो रुपये अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी न देण्याचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला हा निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये राहणाऱ्या महिलेने दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाविरोधात सत्र न्यायालयात याचिका केली होती. पत्नीचे वार्षिक उत्पन्न पतीच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा तीन लाखांहून अधिक आहे. या पाश्वभूमीवर पत्नीला पतीकडून निर्वाह भत्ता मिळू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

कमावत्या पत्नीलाही पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी अन्य परिस्थितीही विचारात घ्यायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्नीच्या पोटगीचा निर्णय हा गुणवत्तेच्या निकषांवर असायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या प्रकरणात पतीपेक्षा पत्नीचे उत्पन्न अधिक आहे का आणि पत्नीला पोटगी मिळायला हवी का, असा प्रश्न निर्माण होतो. प्रथमदर्शनी पत्नीचे वार्षिक उत्पन्न अधिक असल्यामुळे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला पोटगी नाकारण्याचा निर्णय वैध आहे, असे न्या. सी. व्ही. पाटील यांनी निकालात म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी पत्नीने पतीविरुद्ध आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पतीच्या शारीरिक सक्षमतेबाबत संशय व्यक्त केला होता. त्यांना एक मुलगा आहे; मात्र या आरोपांनंतर तिला घर सोडण्यासाठी भाग पाडले, असा दावा तिने केला आहे. न्यायालयाने मुलासाठी १० हजार रुपये पोटगी निर्धारित केली आहे. तसेच अन्य मुद्द्यांवर नियमित न्यायालयात सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले. पत्नीने सत्र न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी याचिका केली होती; तर पतीने मुलाच्या निर्वाह भत्त्याचा आदेश रद्दबातल करण्यासाठी याचिका केली होती.