नविन रेल्वे तिकीट घर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नविन रेल्वे तिकीट घर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत
नविन रेल्वे तिकीट घर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

नविन रेल्वे तिकीट घर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

खर्डी, ता. ३१ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील खर्डी स्थानकाच्या पश्चिम बाजूस गेल्या दोन महिन्यांपासून तिकीटघर बांधून तयार आहे, पण तिकीट घराचे उद्‌घाटन होत नसल्याने प्रवाशांना खर्डी स्थानकात जाऊन तिकीट काढावे लागत आहे. तसेच या तिकीट घरालगत पार्किंग केले जात आहे. त्यामुळे हे तिकीटघर लवकर सुरू करण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांतून केली जात आहे.
खर्डी स्थानकातून परिसरातील १०० गावे आणि ७० आदिवासी पाड्यांसहित, वाडा तालुक्यातील हजारो नागरिक रोज ये-जा करीत असतात. खर्डी स्थानकाच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही बाजूंना अनेक गावे असल्याने कर्मचारी, मजूर, व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमानी हे प्रवास करीत असतात. सध्या खर्डी स्थानकात तिकीटघर असल्याने प्रवाशांना स्थानकात जाऊन तिकीट काढावे लागत आहे. पण खर्डी रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूस दोन महिन्यांपासून नवीन तिकीटघर बांधून तयार आहे. हे तिकीट घर सुरू केल्यास प्रवाशांना येथून तिकीट काढून सरळ स्थानकात जाण्यासाठी पूल असल्याने कोणतीही अडचण येणार नाही; परंतु हे तिकीटघर अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील उघड्या जागेत प्रवासी आपली वाहने उभे करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना येथून ये-जा करण्यास अडचण होत आहे.
-----
पार्किंगचा विळखा
रेल्वेस्थानकात तिकीट काढायला किंवा स्थानकात जाताना उंच पुलावरून जावे लागत असल्याने व येथे संरक्षक भिंत नसल्याने येथील प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून तिकीट काढायला ये-जा करीत आहेत. नवीन तिकीटघर सुरू नसल्याने बाहेरगावाहून येणारे प्रवासी आपल्या गाड्या या तिकीट घराच्या आसपास पार्किंग करीत असल्याने येथे पार्किंग झोन निर्माण झाला असल्याने त्या नवीन तिकीट घराला पार्किंगचा विळखा बसला आहे.
-----
पूर्वेलाही सुविधा सुरू करा
खर्डी स्थानकाच्या पूर्वेस धामणी, दळखण व उंबरखांड (चांदा) या तीन ग्रामपंचायत असून येथील प्रवाशांना पश्चिमेकडे असणारे नवीन तिकीटघर गैरसोयीचे ठरणार असल्याने पूर्व बाजूसही नवीन तिकीटघर सुरू करण्याची मागणी दळखणचे माजी सरपंच भगवान मोकाशी यांच्यासह प्रवाशी करीत आहेत.
-----
खर्डी स्थानकातील पश्चिम बाजूला असलेले नवीन तिकीटघर सुरू करावे, जेणेकरून प्रवाशांना पुलाचा वापर करून स्थानकात जाता येईल. तसेच रेल्वेस्थानकात असलेल्या तिकीट घरात जाताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.
- विशाल जाधव, प्रवासी
-------
खर्डी येथील नवीन तिकीटघर तांत्रिक अडचणी दूर करून जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- शिवराज मानसपुरे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे