शहापूर तालुक्यात पाणी टंचाईचा वाढता आलेख

शहापूर तालुक्यात पाणी टंचाईचा वाढता आलेख

शहापूर, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यात भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून २०४ गावपाड्यांना तब्बल ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पाणीटंचाईमुळे महिला हवालदिल झाल्या आहेत.
कसारा-वाशाळा परिसरातील विहिरी, हातपंप आणि आता अनेक पाणी योजनांचाही स्रोत आटल्याने रणरणत्या उन्हात महिलांना पाण्यासाठी किमान दोन ते अडीच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा, वैतरणा, मध्य वैतरणा या धरणांतून मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींमधील ४५ गावे व १५९ पाडे असे एकूण २०४ गावपाडे टंचाईग्रस्त असून त्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रणरणत्या उन्हामुळे विहिरी, हातपंप यांसह पाणी योजनांचेही स्रोत आटत चालल्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये रोज वाढ होत आहे. टँकर उपलब्ध होईपर्यंत महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यातील वेळूक ग्रामपंचायतीमधील तेलमपाडा, पाटोळ, पाटोळपाडा येथील पाणी योजनांचा गेल्या महिन्याभरापासून स्रोत आटल्याने, तसेच गावालगत असलेल्या विहिरीतील पाणी गढूळ व पिण्यायोग्य नसल्याने महिलांना पाण्यासाठी तब्बल अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळा सोसून त्रस्त झालेल्या वेळूकच्या महिला सरपंच देवकी धोपटे, माजी सरपंच मंजुळा कालचिडा, आशा पोकळा यांसह कमळू उघडा, गणपत धोपटे यानी टँकर सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
२०११ च्या जनगणनेनंतर लोकसंख्येत तीन ते चार पटीने वाढ झाली असली तरी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून या टंचाईग्रस्त गावपाड्यांतील किमान ६२ हजार लोकसंख्येला माणसी २० लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने टँकर वाढवून मिळावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com