ओला-उबरच्या ५० टक्के चालकांनी सोडला कॅब व्यवसाय

ओला-उबरच्या ५० टक्के चालकांनी सोडला कॅब व्यवसाय

मुंबई, ता. ३० ः मुंबईतील ओला आणि उबरचालकांनी इतर कामाकडे मोर्चा वळवल्याने ॲपबेस्ड कॅब व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. परिणामी रस्त्यांवरील कॅबची संख्या झपाट्याने घटली असून, गाडीसाठीचा वेटिंग टाइम वाढला आहे. कंपन्यांकडून कॅबचालकांना प्रवासी वाहतुकीसाठी फक्त ८ ते १० रुपये प्रतिकिमीचा दर मिळत असल्याने दिवसभरात इंधनाचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहही होत नसल्याने अखेर चालकांनी इतर व्यवसाय करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या नोंदीनुसार काळी-पिवळी टॅक्सी, आंतरशहर आणि ॲग्रिगेटर कॅबसह टी-परमिट असलेली ८० हजार वाहने आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षाही कमी कॅब सध्या रस्त्यांवर दिसत आहेत. त्यामुळे मुंबईत आता
ऑनलाईन ॲपबेस्ड कॅबचालकांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक चालकांनी कर्जामुळे गाड्या बँकेला परत केल्या आहेत. काहींनी आपल्या कॅब उभ्याच ठेवल्या आहेत.

१० रुपये प्रतिकिलोमीटरमध्ये चालक टी-परमिट गाडी कशी चालवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. चालकाला वार्षिक कर, रोड टॅक्स, फिटनेस इत्यादी विविध खर्च असतात. त्यामुळे कमीत कमी १२ रुपयांपेक्षा जास्त दर न मिळाल्यास गाडी चालवणे शक्य नाही, असे चालकांचे म्हणणे आहे. दिवसाला १४ ते १५ तास गाडी चालवून फक्त चारशे रुपये शिल्लक राहत आहेत. त्यामध्येही ऑनलाईन दंडामुळे कॅबचालक आर्थिक संकटात सापडला आहे, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे सचिव आनंद कुटे यांनी सांगितले.

परिवहन विभागाचे इंटरसेप्टर व्हेईकल पुलाच्या उतरत्या भागावर ठेवले जाते. कामोठे पूल, कळंबोली, मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे अशा सर्व महामार्गांवर उतरत्या भागावरच इंटरसेप्टर व्हेईकल लावले जात आहे. उतारावर छोटी गाडी ब्रेक लावून ठेवता येते; मात्र ट्रक-ट्रेलरचे ब्रेक लावले जात नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होतात. त्याचा फटका कॅबचालकांना बसत आहे. भविष्यात राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या ॲग्रिगेटर पॉलिसीत अशा सर्व गोष्टी गृहीत धरणे फार गरजेचे आहे.
- आनंद कुटे, सचिव, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com