
बॅटरीवरील वाहने सुसाट
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः वाढत्या महागाईत इंधनाला पर्याय म्हणून नागरिकांनी खरेदी केलेल्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांसाठी लवकरच महापालिकेतर्फे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होणार आहेत. केंद्र सरकारच्या पॉवरग्रीड या नामांकित कंपनीतर्फे चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे बसवण्यात येत असलेले चार्जिंग स्टेशन साधारणतः दोन महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याने बॅटरीवरील वाहने सुसाट धावणार आहेत.
भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातर्फे दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांकरीता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना आहे. या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरीता अनुदान दिले जाते. याच योजनेंतर्गत नवी मुंबई शहराच्या वाट्याला २० चार्जिंग स्टेशन आली आहेत. या चार्जिंग स्टेशन कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड नसावी, याकरिता महापालिकेने पॉवरग्रीडसारख्या नामांकित कंपनीला २० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सोपवले आहे. अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पॉवरग्रीडने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी आणि उपकरणांच्या कामांना सुरुवात झाली आहे. कामाचा वेग आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता पाहता चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे.
---------------------------------
चार्जिंग स्टेशनचे फायदे
- नवी मुंबई शहरात सध्या इलेक्ट्रिक वाहनधारकांना घरगुती चार्जिंगवर वाहने चार्ज करावी लागत आहेत. केव्हाही वाहनाचे चार्जिंग संपू नये म्हणून इलेक्ट्रिक वाहन असणाऱ्या शहरामध्ये वाहन फिरवावे लागते. मात्र, या चार्जिंग स्टेशननंतर चार्जिंगची कटकट मिटणार असून अर्ध्या तासामध्ये वाहन चार्ज होणार आहे.
- नेरूळ येथे २० चार्जिंग स्टेशन बसवणार आहेत. एका चार्जिंग स्टेशनवर सहा चार्जर असणार आहेत. एका चार्जरवर तीन वाहने चार्ज होऊ शकतात. सहा चार्जरमध्ये दोन दुचाकी आणि तीन चाकी वाहने चार्ज होतील. सामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी दोन चार्जर म्हणजे एकाच वेळेस सहा वाहने चार्ज होऊ शकतात; तर उर्वरित दोन चार्जरवर वाणिज्य स्वरूपाची अर्थात टॅक्सी सारखी वाहने चार्ज करता येणे शक्य होणार आहे.
-------------------------------------
अर्ध्या तासामध्ये १८ वाहने चार्ज
नेरूळच्या चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळेस १८ वाहने अर्ध्या तासामध्ये चार्ज होतील. बसवण्यात येणारे चार्जर पूर्णपणे फास्ट चार्जर असल्याने दुचाकी, तसेच तीन चाकीला साधारणतः १५ ते २० मिनिटे चार्जिंग करण्यासाठी लागणार आहेत. बाकी इतर वाहनांना ३० मिनिटे लागणार आहेत.
-----------------------------------
एवढा खर्च येणार
ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे बसवण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनला महावितरणतर्फे वीज देण्यात येणार आहे. नवीन चार्जर स्टेशनवर वाहनचालकांना एका युनिटमागे १७ रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. २० ते २५ युनिटमध्ये वाहन चार्ज झाल्यास ३४० ते ४२५ रुपये इतका खर्च येईल.