
Mumbai Crime : किरकोळ वादावरुन परप्रांतीय फेरीवाल्यांची, महापालिका कर्मचारी नरेश चव्हाणला लाकडी दांडक्याने मारहाण
डोंबिवली - मंगळवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद होत तीन ते चार फेरीवाल्यांनी मुंबई महापालिका कर्मचारी नरेश चव्हाण याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा रामनगर पोलिसांनी दोन फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
डोंबिवलीतील नेहरू रोड परिसरात नरेश चव्हाण हे कुटुंबासह राहतात. मंगळवारी सायंकाळी ते कामावर जाण्यासाठी निघाले होते. डोंबिवली स्टेशन परिसरातील मधुबन टॉकीज गल्ली ही पूर्णतः फेरीवाल्यांनी वेढली आहे. येथून जात असताना त्यांचा पाय एका फेरीवाल्याच्या सामानाला लागला. यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर पुढे वादात होऊन फेरीवाल्याने नरेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या वेळी आजूबाजूचे फेरीवालेदेखील तेथे येऊन तीन ते चार जणांनी नरेश यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. नरेश यांच्या उजव्या खांद्यावर, नाकाला, छातीवर, पाठीवर मारहाण केली गेली आहे. या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात रामआश्रय वर्मा (वय २३) आणि श्रीपाल रामआश्रय वर्मा (वय २५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून किरकोळ कारणांवरून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.
मार्च महिन्यात रुग्णवाहिका चालकाला फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर मनसेने आक्रमक होत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा, अशी मागणी केली. पालिका प्रशासनाने ही बाब गंभीर घेत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवले. मात्र ही मोहीम थंडावताच पुन्हा स्टेशन परिसरात फेरीवाले सक्रिय झाले आहेत.