
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता बदल होणार नाही : मंगल प्रभात लोढा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : कर्नाटक निकालाबाबत बोलले जातेय; पण त्याच वेळी उत्तर प्रदेशाचाही निकाल आला. तेथे १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागून त्याबाबत कोणी बोलत नाही. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ताबदल असे काहीही होणार नाही. कारण, महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे मत पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाण्यात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी यापूर्वी २० कोटी निधीपेक्षा जास्त निधी दिला असून यंदा विशेष योजना राबवण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच लोढा यांनी फेरीवाला योजनेबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली; तर खासदार संजय राऊत यांच्याकडून केलेल्या आरोपांना उत्तर देणे त्यांनी प्रामुख्याने टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपतर्फे राबवण्यात येणाऱ्या मोदी@९ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपाच्या ठाणे खोपट येथील कार्यालयात राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद झाली. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गीता जैन, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, प्रदेश प्रवक्ते सागर भदे आदींची उपस्थिती होती.
---
ठाणे रेल्वे स्थानकासाठी ८०० कोटी रुपये मंजूर
जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाची निविदा पूर्ण झाली असून, लवकरच कामाला सुरुवात होईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.