
ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांना अहिल्यादेवी पुरस्कार
मुंबई, ता. ३१ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवून समाजविकासात योगदान द्यावे असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे सांगितले.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आज सह्याद्री अतिथिगृहात झाला. यावेळी लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सामाजिक कार्यकर्ता डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच व पुरस्कारप्राप्त महिला यावेळी उपस्थित होत्या. महिला आज सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज दिलेला पुरस्कारामुळे नव्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी महिला सज्ज होतील, असेही लोढा म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, समाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७,८९७ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देवून आज गौरवण्यात आले.