
बेकायदा पार्किंगविरोधात मोहीम
घणसोली, ता. १ (बातमीदार)ः कोपरखैरणेसह घणसोली येथील सार्वजनिक बस थांब्यांना खासगी वाहतुकीचा विळखा पडला होता. या वाहनांवर कडक कारवाई करा, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून कोपरखैरणे, घणसोली भागातील बस थाब्यांवरील बेकायदा पार्किंगवरील कारवाईला वेग आला आहे.
नवी मुंबई शहरातील अनेक बस थाब्यांना गराडा घालून वाहने उभी केली जात असल्यामुळे प्रवासी तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत होता. याबाबत नागरिकांकडून कोपरखैरणे वाहतूक शाखेकडे तक्रारी येत असल्याने वाहतूक शाखेने सोमवारपासून कोपरखैरणे, घणसोली भागातील बस थांबे तसेच रस्त्यांवरील उभी केलेली वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून बस थांबे तसेच बाजूच्या रस्त्यावरील वाहने काढून रस्ते मोकळे केले जात आहे. तसेच वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, याकरिता विविध उपक्रमही राबवले जात आहेत.
---------------------------------
महिन्याभरात २,६३२ वाहनांना दंड
मे २०२३ या पूर्ण महिन्याभरात २,६३२ नियम मोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये नियम मोडणारे रिक्षाचालक, दारू पिऊन वाहन चालवणे, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर, अनधिकृत पार्किंग कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३१ मे रोजी सायंकाळी अपोलो हॉस्पिटल व कोपरखैरणे वाहतूक विभाग यांच्या सहयोगाने डी मार्ट सर्कल या ठिकाणी एक पथनाट्यातून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------
वाहतुकीचे नियम न पाळल्यास कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
- विश्वास भिंगारदिवे, वाहतूक शाखा प्रभारी, कोपरखैरणे