
वसई नवघरमधील रुग्णालय बांधकाम रखडले
विरार, ता. ६ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत नवघर येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी जागेची पाहणी करून नकाशेही तयार करण्यात आले आहेत; मात्र हा प्रश्न २०१४ पासून प्रलंबित राहिला असून, त्या जागेवर प्रत्यक्ष कमला सुरुवात झाली नसल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वसई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे यांची भेट घेऊन कामाबाबत माहिती घेतली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये तालुकाप्रमुख राजाराम बाबर, जिल्हा सचिव विवेक पाटील, स्थानिक लोकाधिकार समितीचे किरण फडणवीस, उपतालुका प्रमुख सुनील मुळे, शहरप्रमुख संजय गुरव यांचा समावेश होता. वसई तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या रुग्णालय बांधकाम व निधी मंजुरीसाठी २०१९ ला मान्यता देण्यात आली आहे. त्या वेळी ४४ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. इमारतीच्या बांधकामाबाबत उशीर होत असल्याने आता निधीत वाढ होणार आहे. त्यामुळे लवकर बांधकाम सुरू करावे, असे आरोग्य सेवाचे उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना २०१९ मध्ये पत्र दिल्यानंतरही गेल्या तीन वर्षांत या रुग्णालयाचे एक टक्काही बांधकाम सुरू करण्यात आले नाही.
=============
हॉस्पिटलचे काम मंजूर झाले आहे; परंतु काही अडचणी असल्याने हे काम सुरू झालेले नाही. आम्ही महानगरपालिकेकडून बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी तसेच नव्याने हॉस्पिटलमध्ये अनेक विभाग वाढवण्याचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे आता खर्च वाढणार आहे. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रशांत ठाकरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग