स्मृती उद्यान पालिकेच्या विस्मृतीत

स्मृती उद्यान पालिकेच्या विस्मृतीत

वाशी, ता. १ (बातमीदार)ः पर्यावरण संवर्धनासह स्मृती वनातून प्रियजनांच्या स्मृती जपण्यासाठी पालिकेने ज्वेलस् ऑफ नवी मुंबई या ठिकाणी स्मृती उद्यानाची निर्मिती केली होती. या उद्यानाच्या संकल्पेनाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. पण उद्यानांच्या देखभालीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे मूळ संकल्पेनालाच हरताळ फासला गेला आहे.
महापालिकेकडून ‘हरित नवी मुंबई’ ही संकल्पना राबवण्यात येत असताना शहरात हिरवळ निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून पाच वर्षांपूर्वी नेरूळ येथील सेक्टर २६, ज्वेलस् ऑफ नवी मुंबई येथे पालिकेकडून स्मृती उद्यान विकसित केले होते. या स्मृती उद्यानासाठी हजारांच्यावर अर्ज दाखल झाले होते. तसेच पालिकेच्या या उपक्रमांचे कौतुक झाले होते. या स्मृती वन उद्यानांमध्ये बालकाच्या जन्माच्या आनंदानिमित्त शुभेच्छा वृक्ष, शुभविवाहाचे औचित्य साधून शुभमंगल वृक्ष, परीक्षा व इतर क्षेत्रांतील यशाबद्दल आनंद वृक्ष, सासरी जाणाऱ्या मुलींसाठी शुभेच्छा, प्रियजनांच्या मृत्यूनंतर स्मृतिवृक्ष अशा विविध प्रसंगाची आठवण वृक्ष रोपे लागवड केली जात होती. तसेच या वृक्षलागवडीकरीता इच्छुकांकडून प्रतिवृक्ष एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आले होते, पण सध्या या वृक्षांचे संर्वधन झाले नसल्याने मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.
----------------------------------------
लोखंडी पाट्यांची गर्दुल्ल्यांकडून चोरी
स्मृती उद्यानामध्ये कोरोनाच्या काळापासून सुरक्षेची असणारी कमतरतेमुळे या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी पाट्या गर्दुल्ल्यांनी चोरून नेल्या असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले; तर स्मृती वनामध्ये लावण्यात आलेल्या झाडांच्या ठिकाणी आजूबाजूला गवत वाढल्याने तिथे फेरफटका मारता येत नाही.
----------------------------
स्मृती वृक्षांची अवस्था त्रासदायक
माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त झाडे लावण्यासाठी नोंदणी केली होती, पण या ठिकाणी गेल्यांनतर तिथे कुठेच त्यांच्या नावाची पाटी दिसली नाही. त्यामुळे या उद्यानाला अवकळा आली असून स्मृती वृक्षांची झालेली अवस्था खरोखरच त्रासदायक असल्याची नाव न छापण्याच्या अटीवर एका नागरिकाने दिली आहे.
---------------------------
ज्वेलस् ऑफ नवी मुंबई पार्कमध्ये लावण्यात आलेल्या स्मृती उद्यानांची माहिती घेतली जाईल. तसेच या उद्यानाच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.
- दिलीप नेरकर, उप-आयुक्त उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com