वसईकरांच्या नशिबी तारीख पे तारीख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईकरांच्या नशिबी तारीख पे तारीख
वसईकरांच्या नशिबी तारीख पे तारीख

वसईकरांच्या नशिबी तारीख पे तारीख

sakal_logo
By

वसई, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेला प्रतिदिनी ३७२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिकेकडे १४२ एमएलडी पाण्याची तूट होत आहे. सूर्या प्रादेशिक योजनेचे पाणी मे अखेरीला येणार, अशी घोषणा महापालिका प्रशासनाने केली होती. मात्र अद्याप पाणी आलेले नाही. आता १५ जूनपर्यंत नवीन योजनेचे पाणी येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे वसईकरांच्या नशिबी पाण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.

वसई, विरार शहरात पाण्याची समस्या अनेक ठिकाणी आहे. ग्रामीण परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. महिलांना एका हंड्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच नळजोडण्या मिळाल्या नसल्याने त्यांचे हाल वाढत आहेत. त्यात सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मे अखेरीस पाणी येणार होते, मात्र तेही मिळाले नाही. त्यामुळे शहरातील समस्या जैसे थे आहे.

एमएमआरडीएकडून वसई-विरार पालिका आणि मिरा-भाईंदर महापालिकेसाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले आहे. यातून वसई, विरार शहराला एकूण १६५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. महापालिका क्षेत्रात जलवाहिनी व अन्य कामे हाती घेतली; परंतु काही तांत्रिक कारणास्तव वसईच्या अंगणी पाणी येण्यास १५ दिवस विलंब लागणार असल्याने प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेला जाणवणारी १४२ एमएलडी पाणी पुरवठ्याची कमतरता आणि त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी २४ एप्रिलपासून आखलेले पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक हे जूनच्या अखेरीपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाणी येईल की अद्याप पुढची तारीख वसईकरांच्या नशिबी असेल, हे १५ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

नळजोडण्यांना होणार विलंब
सूर्य प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी येणार म्हणून महापालिका प्रशासनाने नळजोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना केले; परंतु पाणी येण्यास अद्याप १५ दिवस लागणार असल्याने शहरात नव्या नळजोडण्या घेण्यासाठी विलंब लागणार असल्याचे दिसून येत आहे.

पाणीपुरवठ्याला उशीर
एमएमआरडीएच्या पाणी योजनेतून येणाऱ्या पाणीपुरवठ्यास तांत्रिक कारणामुळे उशीर लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक हे जूनपर्यंत आखण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील प्रभागात पाणी वितरण करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.