
मासळी विकण्यास चार दिवस परवानगी
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मासेमारीचा हंगाम संपुष्टात आला असला तरी पुढील चार दिवस नौकेद्वारे मासळी विक्रीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मच्छीमारांना मोठाच दिलासा मिळाला आहे. यापूर्वी १ जूनपासून कोणत्याही नौकेत मासळी आढळली, तर मत्स्य व्यवसाय विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र आता या विभागाने चार जूनपर्यंत मासळी विक्रीसाठी परवानगी दिली आहे.
३१ मे रोजी मासेमारीचा हंगाम संपला आहे. बहुतांश मासेमारी नौका ३१ तारखेला बंदरात दाखल झाल्या आहेत. मासेमारी बंद होत असल्याने मच्छीमार मोठ्या प्रमाणात मासे पकडून आणतात. सर्वच नौका यादिवशी बंदरात येत असल्याने ही सर्व मासळी बाजारात एकत्र गेली तर मासळीचे भाव कोसळतात. त्यामुळे मच्छीमार एक-दोन दिवस थांबून मग ती मासळी अन्य ठिकाणी नौकेतून विक्रीसाठी नेत असतात. मात्र एक जूनपासून मत्स्य व्यवसाय विभागाकडून समुद्रात गस्त सुरू होते. मासेमारीला बंदी असल्यामुळे मासळीने भरलेल्या नौका आढळून आल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षी याच पद्धतीने एक जूनला नायगाव येथे मासळी विक्रीसाठी जाणाऱ्या नौकेवर कारवाई केली होती. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
मच्छीमारांच्या मागणीला यश
किनाऱ्याजवळच मासळी विक्रीसाठी जाणाऱ्या नौकेवर कारवाई न करता खोल समुद्रात एखादी नौका मासेमारी करत असेल तर त्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करावी. मात्र ३१ मेपर्यंत किमान चार दिवस मासळी विक्रीसाठी जाणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी मच्छीमार संघटना, मच्छीमार सोसायट्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे केली होती. खासदार राजन विचारे यांनीदेखील यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यावर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सर्व सहायक आयुक्तांना लेखी आदेश काढण्यात आले आहेत.
काय म्हटले आहे आदेशात?
३१ मे रोजी बंदरात परतलेल्या नौकांमधील मासळी विक्रीसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. ते गृहित धरून मासळी विक्रीसाठी कोणतेही निर्बंध लादू नयेत. मात्र १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जाणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी, असे या आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.