
शिवाजी रुग्णालयात भंगाराच्या विळख्यात
किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १ : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ठाणे, पालघर जिल्ह्यातून व ठाणे शहर उपनगरातील हजारो रुग्ण दररोज येत असतात; परंतु रुग्णालयात अनेक ठिकाणी निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आले आहे. यामुळे हे रुग्णालय भंगाराच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे.
कळवा रुग्णालययात दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावर, गच्चीवर मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, लाकडी साहित्य, कागद, मोडके फर्निचर, प्लास्टिक पिशव्या आदी भंगार साहित्याचे ढीग साठल्याचे दिसून येते. रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अनेक वॉर्ड आहेत. यामध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. जर शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे या भंगाराला आग लागली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या मजल्यावर अतिदक्षता कक्ष आहे. तेथील पॅसेजमध्ये रुग्णांसोबत आलेले नातेवाईक झोपलेले असतात. तसेच पहिल्या मजल्यावरील मागील बाजूस लहान मुलांचा वॉर्ड आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यास मोठे संकट उभे राहू शकते. त्यामुळे वेळीच हे साहित्य हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
जुनी फाईल गायब
भंगार काढण्यासाठी महापालिका मुख्यालय प्रशासनाने याआधी जुनी मंजूर केलेली फाईल रुग्णालय प्रशासनाने हरवली असल्याची खात्रीलायक माहिती एका रुग्णालय कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सध्या प्रशासन हे भंगार विकण्यासंदर्भात नवीन फाईल तयार करीत आहे.
जिल्हा रुग्णालयाचाही भार
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू असल्याने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल होत आहेत. सध्या रुग्णालयाच्या ओपडीवर प्रचंड गर्दी होत आहे. अशात पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांमुळे रुग्णालयात गर्दी वाढणार आहे. पावसाळ्यात यातील कागदाचा व पुठ्यांचा भंगार कुजल्यास त्याची दुर्गंधी संपूर्ण रुग्णालयात पसरणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्वरित हे भंगार हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
आम्ही आमच्या रुग्णाबरोबर आलो आहोत. येथे बाहेर रात्री झोपल्यावर जिन्यावरील पुठ्यांच्या घाणीमुळे खूप डास चावत असल्याने झोप लागत नाही.
- रामू वनगा, रुग्णाचे नातेवाईक
पाच हजारांच्यावर भंगाराची किंमत असेल तर ते काढण्यासाठी महासभेची मंजुरी घ्यावी लागते. या संदर्भात पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे भंगार काढले जाईल.
- अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, शिवाजी महाराज रुग्णालय