
वाशी गावातून गुटख्याचा साठा जप्त
नवी मुंबई (वार्ताहर) : वाशी गावातील एका घरावर छापा मारून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह विदेशी सिगारेटचा माल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या नारायणसिंग दुलावतला (वय-३३) अटक केली.
वाशी गावातील एका इमारतीमध्ये प्रतिबंधित केलेला गुटखा, तसेच तंबाखूजन्य पदार्थांसह विदेशी सिगारेटची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलिसांना एका घरातून ५० हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामुळे वाशी पोलिसांनी नारायणसिंग दुलावत याच्याविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, तसेच अन्न सुरक्षा आणि मानदे अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या घरात सापडलेला गुटखा व सिगारेटचा साठा व ६३ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. यावेळी नारायणसिंग याने सदर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ, तसेच सिगारेटचा साठा कुठून आणला, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.