
मद्यधुंद चालकाची चार वाहनांना धडक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : दारूच्या नशेत असलेल्या चारचाकी वाहनचालकाने बुधवारी (ता. ३१) रात्री चार वाहनांना धडक देत त्यांचे नुकसान केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेला घडली. यामध्ये दोन रिक्षा, एक चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले आहे. तसेच चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाहनांना धडक दिल्यानंतर चालक गुर्मीत वाहन चालवत इतर वाहनांनाही धडक देत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चालकास मारहाण करत त्याच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर त्याला पकडून विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी तानाजी काटे (वय ५२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पश्चिमेत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास श्रीधर म्हात्रे चौक परिसरात काटे हा आपली चारचाकी गाडी घेऊन जात होता. तो नशेत धुंद असल्याने त्याने पहिल्यांदा एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या वेळी रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्याने गाडी तशीच पुढे नेली. पुढे श्रीधर म्हात्रे चौकात त्याने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. त्या वेळी चारचाकी वाहनचालकाने त्याला पकडून जाब विचारला असता तो नशेत असल्याने त्याने फिर्यादी वाहनचालकास अरेरावी, दमदाटी करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. याच वेळी तानाजी याने दोन रिक्षांना व काही दुचाकींना धडक दिल्याची गोष्ट तक्रारदार यांच्या कानावर आली. तानाजीच्या या वर्तनामुळे संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण केली, तसेच त्याच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर त्याला विष्णूनगर पोलिस ठाण्यात हजर करत पोलिसांच्या स्वाधीन केले.