
रिक्षा नाल्यात पडल्याने तिघांचा मृत्यू
भिवंडी, ता. १ (बातमीदार) : मुंबई फिरण्यासाठी रिक्षाने गेलेल्या टिटवाळा येथील कुटुंबाचा रात्री परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने रिक्षा नाल्यात पडून कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकासह चार जण जखमी झाले आहेत. मुन्नीदेवी चव्हाण (वय ३२), राधा चव्हाण (वय ३३), अंशिका चव्हाण (वय २) अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत.
टिटवाळा येथील राकेश चव्हाण हा सर्वांना घेऊन रिक्षाने मुंबई फिरण्यासाठी गेला होता. रात्री उशिरा घरी परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर अचानक त्याच्या रिक्षाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे रस्त्याकडेच्या खांबाला ठोकर मारल्याने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा नाल्यात पडली. ही घटना रात्री साडेअकरा वाजता घडली. नाल्यात माती आणि पाणी साचलेले होते. त्यामुळे रिक्षा पाण्यात बुडू लागली. तेव्हा राकेशने त्यामधून डोके वर काढून ओरडण्यास सुरुवात केली. त्याची हाक ऐकून काही जण तेथे पोहोचले. त्यापैकी एकाने पाण्यात उडी घेतली; मात्र तोदेखील गंभीर जखमी झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी दोरी टाकून त्या परिवारास बाहेर काढले आणि सर्वांना इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचवले. तेव्हा डॉक्टरांनी राकेशची पत्नी मुन्नीदेवी, मेहुणी राधा आणि छोटी मुलगी अंशिका अशा तिघांना मृत घोषित केले. या अपघातात राकेश चव्हाण ऊर्फ टोनी, मुलगा रवी, मुलगी अंकिता व अंजली जखमी असून त्यांच्यावर स्थानिक इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
...
वाचवणारेही जखमी
नाल्यात पडलेल्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले तिघे जण बचावकार्य करताना जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा येथील त्याचे नातेवाईक आणि रिक्षाचालक मित्र इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचले. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
...
महामार्गावर काम सुरू!
‘मुंबई-नाशिक महामार्गावर विस्ताराचे काम सुरू आहे. जुना नाला खोदून तेथे रुंदीकरणाचे काम सुरू आहे; मात्र सुरक्षाव्यवस्था केलेली नाही आणि महामार्गावर पथदिवे लावलेले नाहीत. या ठिकाणी पत्रे लावले असते, तरी रिक्षा नाल्यात कोसळली नसती,’ अशी चर्चा रुग्णालयात आलेल्या रिक्षाचालकांमध्ये सुरू होती.