
मुंबई विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या महिलेला अटक
मुंबई, ता. १ : बॅगमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य असल्यामुळे अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये म्हणून मुंबई विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या महिलेला सहार पोलिसांनी अटक केली आहे. रुचा शर्मा असे या प्रवाशाचे नाव आहे. आपल्याकडे बॉम्ब असल्याचा बनाव करून तिने विमानतळावर सोमवारी (ता. २९) गोंधळ घातला होता.
रुचा शर्मा सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाईस जेटच्या विमानाने कोलकात्याला जात होत्या. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ‘चेक इन’ काऊंटरवर आल्या. त्यांच्याकडे २ बॅगा होत्या, ज्याचे वजन २२ किलो होते. देशांतर्गत विमान प्रवासासाठी १५ किलो वजनाची मर्यादा असल्यामुळे अतिरिक्त वजनासाठी शर्मा यांना शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. शर्मा यांनी त्यास नकार देताच स्पाईस जेटच्या महिला कर्मचाऱ्यासोबत त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वेळी अतिरिक्त सीमा शुल्क भरावे लागू नये यासाठी महिलेने बनाव केल्याचे चौकशीत समोर आले आहे. महिलेला न्यायालयापुढे हजर केले असता तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.