
नायब तहसीलदारांना लाच घेताना पकडले
भिवंडी, ता. १ (बातमीदार) : शहरातील तहसील कार्यालयात फेरफार हरकत प्रकरणाच्या निर्णयाची प्रत देण्यासाठी लाच घेताना नायब तहसीलदारांना रंगेहात पकडण्यात आले. मागितलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये घेताना नायब तहसीलदार सिंधू खाडे (वय ३३) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. भिवंडी तहसील कार्यालयात तक्रारदार वकिलांच्या अशिलाची फेरफार हरकत प्रकरणाबाबत दावा सुरू होता. या प्रकरणी दिलेल्या अंतिम निर्णयाची प्रत देण्यासाठी कार्यालयातील नायब तहसीलदार सिंधू खाडे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार वकील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्या रकमेपैकी ५० हजार रुपये गुरुवारी (ता. १) देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा लावला. त्यानुसार नायब तहसीलदार सिंधू खाडे यांना ५० हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाणे येथे खाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.