डोंबिवलीतील एकाची चार कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीतील एकाची चार कोटींची फसवणूक
डोंबिवलीतील एकाची चार कोटींची फसवणूक

डोंबिवलीतील एकाची चार कोटींची फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २ : गुंतवलेल्या रकमेवर १० टक्के परतावा देतो, गुंतवलेले पैसे वर्षात डबल करून व सोने देतो, असे प्रलोभन दाखवत चार कोटींची फसवणूक करण्यात आली. युनिक कन्सल्टन्सीचे मालक व भागीदार यांनी प्रतीक भानुशाली या तरुणाची तब्बल ४ कोटी ६० लाखांत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक आणि भागीदार विनय वर्टी (वय ६८), गीता वर्टी (वय ६०), डॉ. सी. के. नारायण (वय ६०) व श्रीधर (वय ५०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक यांना युनिक कन्सल्टन्सीच्या माध्यमातून विनय आणि गीता व इतर दोघा भागीदारांनी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. वर्षभरात पैसे दुप्पट करून देतो, तसेच सोने देतो, असे प्रलोभन त्यांनी प्रतीकला दाखवले. यानुसार डिसेंबर २०२१ मध्ये ६० लाख ५० हजार गुंतवण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर १० टक्के परतावा आणि वर्षभरात हे पैसे दुप्पट करून देतो, असे आश्वासन दिले. वाढीव व्याज, सोने या प्रलोभनाने चार कोटी रुपये आरोपींनी प्रतीक यांना गुंतवण्यास भाग पाडले. तुम्ही गुंतविलेले पैसे शेअर बाजारात गुंतवल्याने अधिकचा परतावा कमी कालावधीत मिळेल असे त्यांनी सांगितले. झटपट पैसे कमावण्यासाठी प्रतीक यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. दोन वर्षे उलटली तरी आकर्षक परतावा नाहीच; पण मूळ रक्कमही आरोपींकडून परत मिळत नसल्याने ते आपली फसवणूक करत आहेत, याची खात्री झाल्याने प्रतीक भानुशाली यांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक विनय आणि गीता वर्टी व त्यांच्या दोन भागीदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.