टाटा मेमोरियलला आयसीआयसीआयचे सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा मेमोरियलला आयसीआयसीआयचे सहकार्य
टाटा मेमोरियलला आयसीआयसीआयचे सहकार्य

टाटा मेमोरियलला आयसीआयसीआयचे सहकार्य

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : कर्करोग झालेल्यांना आपल्या घराजवळच उपचार मिळावेत, यासाठी टाटा मेमोरियल सेंटरला आंध्र प्रदेश, पंजाब आणि नवी मुंबई येथे तीन उपचार केंद्रे उभारण्यास सहाय्य होण्यासाठी आयसीआयसीआय बँक फाऊंडेशनने बाराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष गिरीशचंद्र चतुर्वेदी यांनी आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. या वेळी सेंटरचे संचालक डॉ. आर. ए. बडवे, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बात्रा हजर होते.

नवी मुंबई, पंजाबमधील मल्लनपुर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एकूण साडेसात लाख चौरस फूट क्षेत्रफळावर ही तीन केंद्रे उभारली जातील. येथे सर्व अत्याधुनिक सुविधा, उपचार पद्धती आणि संशोधनाची यंत्रणा असेल. ही तिन्ही केंद्रे २०२७ पर्यंत पूर्णांशाने कार्यरत होतील. यातील नवी मुंबईच्या केंद्रासाठी सर्वात जास्त म्हणजे ४६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. आयसीआयसीआय फाऊंडेशनतर्फे सीएसआर योजनेतून पाच वर्षांत साधारण अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जातात. त्यापैकी निम्मी रक्कम कर्करोगांवरील उपचारांचे महत्त्व जाणून त्या कामासाठी देण्यात आली आहे, असेही चतुर्वेदी यावेळी म्हणाले.

या निधीतून या केंद्रांचे संपूर्ण बांधकाम होईल; तसेच त्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली जाईल. या तीन केंद्रांमुळे दरवर्षी अतिरिक्त पंचवीस हजार रुग्णांवर उपचार होतील. सध्या देशात दरवर्षी तेरा लाख लोकांना कर्करोग होतो. त्यापैकी जेमतेम सव्वा लाख रुग्णांवर टाटा रुग्णालयात उपचार केले जातात. कर्करोगावर रास्त दरात व अत्याधुनिक उपचार मिळण्याची फारच कमी रुग्णालये भारतात आहेत. सध्या देशातील एक लाख लोकांपैकी मोठ्या शहरात शंभर लोकांना, लहान शहरांमधील ६० लोकांना; तर ग्रामीण भागातील ४० लोकांना कर्करोग होतो. जसजसे देशातील नागरीकरण वाढत जाईल तसतशी रुग्णांची संख्याही वाढेल. त्यामुळे कर्करोगावर उपचाराची नवीन केंद्रे आवश्यक आहेत, असेही बडवे म्हणाले.