नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभे राहणार

नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभे राहणार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : अनेक वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भवन उभारण्याचे सिडकोला आदेश दिले आहेत. गुरुवारी (ता. १) सह्याद्री अतिथीगृहावर आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश दिले. तसेच बारवी धरणग्रस्तांना ज्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरीवर घेतले, त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतील प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र भवनसाठी सिडकोने वाशीतील सेक्टर-३० ए मधील प्लॉट नं. ११, १२, १३, १४ येथे सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या भवनच्या निर्मितीची रखडपट्टी झाली होती. आमदार मंदा म्हात्रे यांनी याबाबत आवाज उठवला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वाशीमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यामुळे या भवनाचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.
वाशी, सेक्टर ३० ए येथील आरक्षित भूखंडावर भव्यदिव्य महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता २०२२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात यावी, याकरिता मंदा म्हात्रे यांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुरवणी मागणीद्वारे मागणी केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल १०० कोटी रुपये महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी तरतूद केल्याचे जाहीर करण्यात आले होते. नवी मुंबई शहर वसवताना सिडकोमार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

------------------
प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी करा
मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की, पूर्वी दिलेल्या आदेशामध्ये फेरबदल करून जसे बारवी धरण प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले; तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमधील स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करावा. जेणेकरून शासनामार्फत त्वरित त्यावर कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यास मदत केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com