खासदार संजय राऊतांचे थुंकणे वादात

खासदार संजय राऊतांचे थुंकणे वादात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुंकले; तर शुक्रवारी दुसऱ्यांदा दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा तीच कृती केली. त्यामुळे राऊत यांची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यानींही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर सावरासावर करत ‘माझ्या जिभेला त्रास झाल्याने मी थुंकलो’, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार संजय राऊत दररोज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदारांवर टीकेचे आसूड ओढत असतात. गुरुवारी (ता. १) संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी थुंकण्याचा प्रकार केला. श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला.

राऊत यांच्या या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील नेत्यांनी ही आपली राजकीय संस्कृती नव्हे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्याचे समजते. आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली; तर आमच्या आमदारांच्या मतांवर निवडून येऊन आमच्याच खासदारांवर थुंकणाऱ्या संजय राऊतांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून येऊन दाखवावे, अस आव्हान शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांना दिले. संजय राऊत यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी युवासेनेच्या वतीने उद्या (ता. ३) आंदोलन करण्यात येणार आहे

प्रसार माध्यमांनी अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत यांना आता किती काळ प्रसिद्धी द्यावी, हे ठरवण्याची वेळ आली आहे. माध्यमांनी आता सीमा आखून घेण्याची गरज आहे. नव्या पिढीला काय दाखवणार आहोत याबाबत भूमिका ठरवण्याची वेळ माध्यमांवर आली आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

थुंकण्यावर बंदी आहे का, असेल तर सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो. माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो, हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली.
- संजय राऊत, खासदार

आज टीकेचा स्तर हा घसरतोय; मात्र सर्वच पक्षाच्या बाबतीत हे होत आहे. संजय राऊत स्वतः एक पत्रकार आहेत. त्यांनी केलेल्या कृतीचे परिणामही त्यांना ठाऊक आहेत. राऊतांचे हे उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत प्रवक्ते आहेत. त्यांची ही कृतीही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, हे त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी पुढे येऊन स्पष्ट केले पाहिजे.
- संजय पाटील, राजकीय विश्लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com