
पर्यावरण संवर्धन ‘साता जन्माचे’
नेरूळ, बातमीदार ः
वटपौर्णिमेचे महिलांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने यमलोक गाठल्याच्या आख्यायिकेतून विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाला फेऱ्या मारतात. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त होते. पण सध्याच्या सिमेंटच्या जंगलात वडाचे झाडच नामशेष होण्याचा मार्गावर असल्याने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन पारंपरिक प्रथांसह आधुनिकतेचा मेळ घातला आहे.
----------------------------------
हिंदू धर्मात पशू-पक्ष्यांसह झाडांनाही विशेष महत्त्व दिले आहे. पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांना पवित्र मानले गेले आहे. या झाडांमध्ये देवांचा वास असतो, असेही सांगितले जाते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, झाडामध्ये विष्णू आणि फाद्यांमध्ये भगवान शिवाचा वास असतो. म्हणून हे झाड त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. तसेच वडाचे झाड हे मोठे दीर्घायुषी असते. त्यामुळे पूर्वी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत होता. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करताना एकत्र जमण्याचे निमित्त होते. कारण पूर्वी ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हेच स्त्रियांचे आयुष्य होते. त्यामुळे महिलांना नटण्याची संधी मिळायची. दोन क्षण आनंदात घालवण्यासाठी वेळ मिळत होता; पण सध्याच्या आधुनिक काळात पुरुषांबरोबरच महिलादेखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. धावपळीच्या जीवनामध्ये सण साजरे करताना सामाजिक भान ठेवून सणाचे स्वरूप जरी बदलले आहे; तरीही आजही घरातील परंपरा जोपासण्यासाठी महिला पूर्वीच्या प्रथांबरोबर पर्यावरण संवर्धनाचे भान ठेऊन वागत आहेत. झाडांच्या फांद्या तोडून त्यांना हानी पोचवण्यापेक्षा वडाच्या झाडांची लागवड करून या सणाचे आगळेवेगळे महत्त्व महिलांकडून जोपासले गेले आहे. तसेच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वटपौर्णिमेच्या दिवशी राहत्या परिसरात जास्तीत झाडे लावून प्रदूषणावर मात करत वटपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
--------------------------------
वटपौर्णिमा आपल्या नवऱ्याबद्दलचे प्रेम, आदर व्यक्त केला जातो; पण ते करताना अनवधानाने पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे वडाच्या झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
- नीलम लोखंडे, महिला
-------------------------------
पूर्वीप्रमाणे सण साजरा करण्यासाठी वेळ, मुहूर्त वगैरे न पाहता प्रत्येक महिलेला शक्य होईल त्याप्रमाणे वटवृक्षाची पूजा करण्यात येते. नोकरी करणाऱ्या महिलांची ऑफिसला जाण्याची धावपळ पाहता घरच्या घरीच प्रतीकात्मक पूजन केले आहे.
-रूपाली रांजणे, नोकरदार महिला
---------------------------------------
सध्याचे जीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. महिलांना संसार सांभाळून बाहेरील कामेदेखील करावी लागतात. यामुळे सणांचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पारंपरिक प्रथा जोपासताना पर्यावरणाचे संवर्धनही महत्त्वाचे असल्याचे पुढच्या पिढीला पटवून देणे गरजेचे आहे.
- उज्ज्वला शिंदे, गृहिणी