कारमालकाला पोलिसांचा ससेमिरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारमालकाला पोलिसांचा ससेमिरा
कारमालकाला पोलिसांचा ससेमिरा

कारमालकाला पोलिसांचा ससेमिरा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : बनावट नंबरप्लेट लावून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एका ठगामुळे उलवेत राहणाऱ्या रवीप्रताप सिंग (६१) यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सिंग यांची कार घरासमोर पार्क असताना त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड बजावण्यात आला आहे. त्यामुळे न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे सेक्टर-९ मध्ये राहणारे रवीप्रताप सिंग (६१) यांनी २०१६ मध्ये मारुती सुझुकी कंपनीची चंदेरी रंगाची सियाझ कार विकत घेतली होती. या कारची नोंदणी मुंबई पूर्व येथील आरटीओमध्ये केली होती. तेव्हापासून या कारचा ते वापर करत आहेत. अशातच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंग कामानिमित्त भुवनेश्वर येथे गेले होते. यावेळी त्यांची कार घरासमोरच पार्क होती. यादरम्यान पोलिसांनी त्यांच्या कारला दोन हजारांचा दंड लावल्याचा मेसेज त्यांना आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातही त्यांना पुन्हा २ हजार रुपयांचा ई-चलनाचा संदेश आला होता. त्यामुळे सिंग यांनी न्हावा-शेवा पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांना केलेल्या तपासात सिंग यांच्या गाडीची बनावट नंबरप्लेट बनवून त्रयस्थ व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या ठगाचा शोध घेतला जात आहे.