पर्यावरण प्रेमामुळेच डोंगरात वनराई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण प्रेमामुळेच डोंगरात वनराई
पर्यावरण प्रेमामुळेच डोंगरात वनराई

पर्यावरण प्रेमामुळेच डोंगरात वनराई

sakal_logo
By

खारघर, बातमीदार
पर्यावरण दिनी वन विभाग तसेच वृक्षप्रेमी रोपलागवड करून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करतात. मात्र, खारघरमधील काही वृक्षप्रेमीने केवळ पर्यावरणाप्रती असलेल्या प्रेमातूनच शहरातील डोंगरावर वनराई फुलवण्याची किमया साध्य केली आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनातून डोंगर हिरवेगार केल्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा होणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------------------------------------
खारघर परिसरात असलेले डोंगर या शहराचे वैभव आहे. चाळीस वर्षांपूर्वी हिरवाईने नटलेल्या खारघर डोंगरावर विविध फळांची झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट तसेच विविध फुलांच्या झाडांच्या गंध दरवळत असे. मात्र, सिडकोने १९८०-८५ मध्ये शहराच्या विकासाला सुरुवात केल्याने डोंगरांचे सपाटीकरण होऊन हळूहळू खारघर गावाचे शहरात रूपांतर झाले. विकासाच्या नावाखाली डोंगरात होणाऱ्या वृक्षतोड तसेच वणव्यामुळे हजारो झाडे नष्ट झाली. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी सिडकोने वन विभागाच्या मदतीने खारघर टेकडीवर नेचर पार्क उभारण्यासाठी प्रकल्प राबवला होता. या वेळी पनवेल वन विभागाने खारघर डोंगरावर पंचवीस हजार रोपांची लागवड केली. मात्र, या प्रकल्पाकडे सिडकोने दुर्लक्ष केल्यामुळे झाडे कोमेजून गेली होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत जवळपास दहा हजारांहून अधिक झाडांचे संवर्धन केले आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली ओबडधोबड झालेल्या डोंगरांवर फुललेली वनराई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
----------------------------------------
खारघरमधील गोल्फ कोर्सलगतच्या डोंगरच्या पायथ्याशी २०१० ते २०१५ या पाच वर्षाच्या काळात सहाशेहून अधिक झाडे पर्यावरणप्रेमींनी स्वखर्चाने जोपासली आहेत. या झाडांवर पक्षी घरटी घालत असल्याचे पाहून समाधान वाटत आहे.
- बी. टी. पाटील, पर्यावरणप्रेमी
-------------------------------------
गुरुवर्य हभप पुरुषोत्तम राय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मके देवे साधक मंडळाचा हा उपक्रम सुरू आहे. संस्थेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राज्यभर रोपलागवड केली जाते.
- दादा मोटे, सदस्य, विश्वात्मके देवे
-----------------------------------------
ओवे डोंगरावर विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. या उपक्रमात पर्यावरणप्रेमी तसेच परिसरातील सोसायटीच्या सदस्यांकडून श्रमदान करीत वृक्ष संवर्धनासाठी सहकार्य मिळत आहे.
- धर्मेंद्र कर, पर्यावरणप्रेमी