पेरणीपूर्व मशागतीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणीपूर्व मशागतीला वेग
पेरणीपूर्व मशागतीला वेग

पेरणीपूर्व मशागतीला वेग

sakal_logo
By

राजेश कांबळे, पेण
भाताचे कोठार म्हणून पूर्वी रायगड जिल्हा संबोधला जायचा. येथे बाराही महिने शेतकरी भाजीपाला, भातशेती तसेच विविध पीक घेत, मात्र गेल्‍या काही वर्षांत भातशेती नापीक होण्याचे प्रकार वाढले आहे. अवघ्‍या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्‍याने पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी भातशेती मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे वेलवर्गीय भाज्यांची लागवडही करण्यात येत आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना भाज्‍यांना पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागते.
जिल्ह्यात भातशेती अनेकांच्या उत्‍पन्नाच्या प्रमुख साधन आहे. त्यामुळे जिल्ह्यात भात बियाण्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कृषी सेवा केंद्राला भेट देत शेतकऱ्यांनी भाजीपाला बियाणे, भात बियाणे, खत खरेदीस सुरुवात केली आहे. मशागतीची कामे, बांधबंदिस्ती करणे, जमीन स्वच्छ करणे यासारखी कामे सुरू आहेत. शेतकरी यंत्राच्या साह्याने नांगरणीत व्यग्र आहेत. तर काही ठिकाणी भात पेरणीचे नियोजन सुरू आहे.
कृषी विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त केंद्रामध्ये भात बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. यामध्ये १६,५०० क्विंटल भात तर १,३४० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सदर भातबियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. भातपिकांबरोबर डोंगरभागात दुय्यम पीक म्हणून नाचणीची लागवड आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असून बियाणे खरेदीसाठी शेतकरी धजावले आहेत.

जिल्ह्यासाठी खरीप हंगामाबाबत बैठक घेऊन सर्व स्तरावर आदेश दिले असून खत, बियाणे शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या रायगडमध्ये भरपूर प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध झाली आहेत.शेतकरी बांधवांची फसवणूक व गैरसोय होणार नाही, याची काळजी विक्रेत्‍यांनी घ्‍यावी.
- जी. आर. मुरकुटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण, निरीक्षक

हवामान खात्याने यंदा पाऊस ८ ते १० दिवस उशिरा होणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच भात पेरणी करावी, घाई करू नये. युरिया खताचा संतुलित वापर करावा व नॅनो युरिया खतांच्या वापरण्यासाठी जातीने लक्ष द्यावे. जर निविष्ठा विक्रेता शेतकरी बांधवाची फसवणूक करत असेल, तर थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा.
मिलिंद चौधरी, कृषी विकास अधिकारी