कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये कल्याणकर धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये कल्याणकर धावणार
कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये कल्याणकर धावणार

कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये कल्याणकर धावणार

sakal_logo
By

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : जगात सर्वांत जुनी आणि प्रसिद्ध अशा दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतर असलेल्या कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये यावर्षी ४०३ भारतीय धावपटू सहभाग घेत आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक कल्याण शहरातून या वर्षी संजय काळुखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरिष शहदादपुरी या मॅरथोनपटूंची निवड झाली आहे. हे तिघे गेले सहा महिने प्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक सतीश गुजराण यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर प्रशिक्षण घेत आहेत.
सतीश गुजराण यांनी स्वतः ११ कॉम्रेडस मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. ११ जूनला होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध धावपटू दिलीप घाडगे यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब न्यू कल्याण आणि रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर यांनी नुकतेच एका शुभेच्छा रनचे आयोजन केले होते. कल्याण, डोंबिवली, पलावा, उल्हानगरमधील १५० पेक्षा जास्त धावपटूंनी या तिघांबरोबर पाच किमी धावून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्‍यानंतर झालेल्या कार्यक्रमात रोटे सुषमा तोमर, रोटे बिजू उंनिथन, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण महापालिकेचे नगर सचिव संजय जाधव, कल्याणमध्ये सायकल आणि धावपटूंना प्रोत्साहन देणारे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, रोटे प्रवीण कुलकर्णी आणि अरविंद काटकर, बाईकपोर्ट सायकलिंगचे साहिर शेख यांनी सुद्धा धावपटूंना शुभेच्छा दिल्या.

अपघातापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन
समारंभाची सांगता करताना दिलीप घाडगे यांनी यापुढे कल्याणचे अधिकाधिक धावपटू आणि सायकलपटू देश-विदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. रोज रस्त्यावर धावण्याचा सराव करताना अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित धावपटूंना केले. त्यांच्या डीजी रनिंग या सामजिक संस्थेसाठी काय उपाययोजना करणार, याची माहिती त्यांनी दिली.