
ठाण्यात ‘माझा तलाव’ चळवळ
पूर्वा साडविलकर, ठाणे
जल अमृत योजनेंतर्गत ठाणे महापालिकेने १५ तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलाव हे केवळ सुंदर नव्हे तर पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित असावेत यासाठी पर्यावण दक्षता मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘माझा तलाव’ ही चळवळ हाती घेण्यात आली आहे. सुमारे ४२ तलावांसाठी ही मोहीम राबवण्यात येणार असून विशेष म्हणजे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग असणार आहे. यामध्ये तलावांचे निरीक्षण करून प्रदूषण आणि जैवविविधतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली २४ वर्षे पर्यावरण शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करत आहे. यंदा पर्यावरण दक्षता मंच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पर्यावरण जनजागृतीची ही नाळ आणखी घट्ट व्हावी आणि ती पुढील पिढीपर्यंत पोचावी, यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने या वर्षी ‘माझा तलाव’ ही चळवळ उभारली आहे. पर्यावरण संवर्धनाची मोहीम शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने अधिक परिणामकारकरीत्या राबविता येते. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांमध्येही लक्षणीय बदल जाणवत असतो. म्हणूनच ‘माझा तलाव’ या मोहिमेमध्येही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
अनोखी दत्तक योजना
ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते; परंतु त्यामधील केवळ ४२ अस्तित्वात आहेत. आपल्याला लाभलेल्या या जलसंपदेचे रक्षण करणे हे स्थानिक प्रशासनासह सामाजिक संस्थेची आणि सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या मोहिमेत शहरातील ४२ तलाव हे विविध शाळा किंवा महाविद्यालयांना दत्तक दिले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेतील ३० ते ३५ विद्यार्थ्यांचा समूह बनविण्यात येणार असून एक शिक्षक किंवा प्राध्यापक या विद्यार्थ्यांसह मोहिमेत सहभागी होणार आहे. या समूहासह संस्थेतील एक सदस्य मार्गदर्शक म्हणून त्यांच्याबरोबर असणार आहे. यामध्ये दररोज एक विद्यार्थी त्याच्या शिक्षकांसह त्याला नेमून दिलेल्या तलावाचे निरीक्षण करणार आहे.
सर्वसामान्यांचे प्रबोधन
महापालिकेने काही संस्थांना तलाव संवर्धन, तसेच बोटिंगचे परवाने दिले आहेत. या सर्व संस्था त्यांच्या जबाबदारीचे कशाप्रकारे पालन करतात याकडे पर्यारवण दक्षता मंडळाचे लक्ष असणार आहे. तसेच तलावांना भेट देणाऱ्या पर्यटकांचे, नागरिकांचे प्रबोधन करून ते तलाव कशाप्रकारे स्वच्छ व पर्यावरण सहयोगी ठेवतात याचे निरीक्षण केले जाणार आहे. तज्ज्ञांच्या साह्याने तलावांना नियमित भेट देऊन निरीक्षणाचा अहवालही सादर केला जाणार आहे.
जबाबदारी सर्वांचीच
‘माझा तलाव’ मोहिमेमुळे शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे मिळणार असून त्यांनाही पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल, असे संस्थेमार्फत सांगण्यात आले. खरेतर ठाणे शहरावर आणि निसर्गावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला व्यापक स्वरूप मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यासाठी संस्थेने जिल्हा प्रशासनालाही पत्र दिले आहे. या मोहिमेला ५ जून म्हणजे पर्यावरण संवर्धनादिनी सुरुवात करणार असल्याची माहिती संस्थेने दिली.
....
ठाणे शहराला तलावांच्या माध्यमातून उत्तम अशी जलसंपदा लाभली आहे. या जलसंपदेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी ‘माझा तलाव’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुरभी वालावलकर-ठोसर, प्रकल्प व्यवस्थापक, पर्यावरण दक्षता मंडळ