शिवगर्जनांनी दुमदुमला रायगड

शिवगर्जनांनी दुमदुमला रायगड

महेंद्र दुसार, अलिबाग
''जय भवानी, जय शिवाजी'' च्या घोषणांनी सध्या रायगड किल्‍ला दुमदुमला आहे. परकीय आक्रमणकाऱ्यांविरोधात लढा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदुस्थानात रयतेचा राजा जन्माला आला आहे, यासाठी राज्याभिषेक करून घेतला. शिवराज्‍याभिषेकदिन सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी किल्‍ले रायगड सजला असून तिथी आणि तारखेनुसार पाच दिवस विविध कार्यक्रमांनी सोहळा रंगणार आहे. त्‍यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर दाखल झाले आहेत.
ज्या शिवरायांनी राष्ट्रप्रेम, स्वभाषा, स्वधर्माबद्दल स्वाभिमान जागवला, त्या शिवरायांच्या पाऊलखुणा असलेल्या किल्ले रायगडवर शिवप्रेमी ऊन, तहान-भूक विसरून बेभान होऊन शिवरायांचा जयघोष करीत आहेत. ढोलताशे, विविध साहसी क्रीडा प्रकार सादर करणारे पथक, शिवरायांचे पोवाडे, गाणी सादर करणारे कलाकार तळ ठोकून आहेत. गडावरील संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे आहे. शिवरायांवर अमाप प्रेम करणारे मावळे त्यांचे पोशाख, त्यांच्या ललकाऱ्या, मध्येच तुतारीचा आवाज आणि अंगावर रोमांच उभा करणाऱ्या शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणीने वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राज्यात वर्षभर कार्यक्रम साजरे होणार आहेत. याची सुरुवात २ जूनपासून किल्ले रायगडवर तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवराज्यभिषेक दिनापासून झाली. दरवर्षी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन कोकण कडा मित्र मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळामार्फत राज्याभिषेकदिन साजरा केला जातो. तर, तारखेप्रमाणे होणाऱ्या ६ जून रोजीच्या राज्याभिषेकाचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेकदिन महोत्सव समितीमार्फत दिवसभर धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संभाजीराजे छत्रपती यांचा दरवर्षी कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो.

हिरकणींचा उत्‍स्‍फूर्त सहभाग
गडावर आलेल्यांमध्ये महिला, तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. पारंपरिक मराठी पोशाख, डोक्यावर पदर आणि हातात तळपती तलवार घेत ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’ अशा जयजयकार करणाऱ्या महिला-मुली दिसून येतात. गिर्यारोहण, गडकिल्ले पाहण्याची आवड असणाऱ्या महिला कुटुंबासह गडावर दाखल झाल्‍या आहेत. नाशिकवरून आलेली गायत्री पाटील यापैकीच एक. महाविद्यालयात असल्‍यापासूनच ती गडावर राज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी येते. यंदा ८ वर्षाच्या मुलीसह पती-पत्नी गडावर आले आहेत. अशाच प्रकारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा येथून आलेल्‍या शिवसंघटनांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.


गडावरील विलोभनीय दृश्य
रोषणाई गड उजळून निघाला आहे. निळेशार आकाश, उंचउंच डोंगर, किल्‍ल्‍यावरील ऐतिहासिक वास्‍तूंची देखणी सजावटीने रात्रीच्या वेळी किल्‍ल्‍यावरील दृश्‍य विलोभनीय दिसते. गडाच्या पायऱ्यांवर दिवे लावण्यात आले आहेत. यामुळे नाना दरवाजा, महादरवाजा, पालखी दरवाजा या मार्गावर रात्रीची चढाई करताना कोणतीही अडचण येत नाही. अनेकजण उष्णतेचा त्रास कमी व्हावा, म्हणून या मार्गांचा वापर करीत आहेत.

निवासासाठी तंबूची व्यवस्था
रायगड किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत आनंद लुटण्यासाठी अनेकजण रात्री याच ठिकाणी निवास करणे पसंत करतात. बाजारपेठेत यासाठी अनेकांनी तंबू ठोकले आहेत. येथून रात्रीचे चांदणे, थंडगार वारा आणि शिवरायांच्या शौर्यकथा ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे. मुंबईहून प्रसाद देसाई आपल्‍या मित्रांसह सोहळ्यासाठी गडावर आला आहे.

एसटीची मोफत सेवा
देशभरातील शिवप्रेमी गडावर येत असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाने पार्किंग ते पायथ्यापर्यंत मोफत बससेवा सुरू आहे. सतत बस सुरू असल्याने शिवप्रेमींना पायथ्यापर्यंत पोहचण्यात कोणतीही अडचण
येत नाही. वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था पोलिस सुरक्षेसह करण्यात आलेली आहे. दुचाकीवरून येणाऱ्या शिवप्रेमींची संख्याही मोठी आहे.

प्रशासनाच्या सुविधा
गडावर आलेल्या शिवप्रेमींच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, वाहतूक, आरोग्य व्यवस्थाची योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याने शिवप्रेमींना विनाअडथळा सोहळ्याचा आनंद लुटता येत आहे. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी किल्ले रायगडवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com