महिलांना लुटणारी दिल्लीची टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना लुटणारी दिल्लीची टोळी जेरबंद
महिलांना लुटणारी दिल्लीची टोळी जेरबंद

महिलांना लुटणारी दिल्लीची टोळी जेरबंद

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : बतावणी करून वृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणाऱ्या दिल्लीच्या टोळीला वसईत अटक करण्यात आली. या टोळीत एका महिलेचा समावेश आहे. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी विरारमध्ये चार दिवस सापळा रचून दिल्लीला जात असताना चार जणांना पडकून ही कारवाई केली.
वसई, विरार, नालासोपारा परिसरात महिलांना बतावणी करून, त्यांना प्रलोभन दाखवून लुटताना ही टोळी लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या टोळीने मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, मिरा-भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे केले आहेत. त्यांनी सध्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ९५ हजारांचे ५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती वसईच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली.
विजय सोळंखी ऊर्फ विजय चव्हाण (वय २०), हरिष रामा राठोड ऊर्फ हरीश विष्णू राठोड (वय २८), रवी पेलाहाद राठोड (वय २८), चौथी बालकिशन परमार ऊर्फ चौथी नारायण सोळंखी (वय ३४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण दिल्लीचे राहणारे आहेत. एखाद्या परिसरात येऊन, तीन महिने रूम भाड्याने घेऊन, या तीन महिन्यांत गुन्हे करून टोळी पुन्हा दिल्लीला पसार होत होती. २८ मे रोजी ६५ वर्षांच्या वृद्ध महिलेला बतावणी करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले असल्याचा वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी पथक तयार करून तपासासाठी रवाना केले होते. या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक महिला आणि दोन पुरुष वृद्ध महिलेला बतावणी करून लुटतानाचा सीसीटीव्ही मिळाला होता. यावरून ही टोळी दिल्लीला जात असताना विरारमध्ये अटक करण्यात आली.