
खारघर, तळोज्यात नालेसफाई संथगतीने
खारघर, ता. ४ (बातमीदार) : पावसाच्या आगमनाचे संकेत मिळत असताना पालिकेकडून अद्यापही खारघर तसेच तळोजा वसाहतीमधील पावसाळी कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरी वस्त्यांमधील गटारे दगड, मातीने भरून वाहत असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे.
खारघर, तळोजा वसाहत सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर झाली आहे. गेल्या वर्षी पालिकेने मे महिन्यात पावसाळी कामांसाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती. मात्र, काही दिवसांत पावसाळा सुरू झाल्यामुळे थातुरमातुर कामे करण्यात आली होती. दरम्यान, या एजन्सीकडे वर्षभराचे कंत्राट असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात तळोजा फेज दोन वसाहतीमधील काही भागातील गटारे साफसफाईची कामे केली होती. मात्र, आजही खारघर सेक्टर अकरा, बारा, वीस, एकोणीस तसेच तळोजा फेज एक आणि दोनमधील गटारे माती, प्लास्टिक आणि केरकचऱ्यांनी भरलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात यावीत, अशा सूचना आयुक्तांकडून असतानाही अद्यापही खारघर आणि तळोजा वसाहतीमधील अंतर्गत गटारांची स्वच्छता झालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
-----------------------------------
मोठ्या नाल्यांवरच पालिकेचे लक्ष
खारघर सेक्टर २ लिटिल वर्ल्ड मॉलसमोरील नाला, सेक्टर सात, बारा, अकरा आणि सेक्टर एकवीसमधून सेक्टर तेरामार्गे कोपरा खाडीत; तर सेक्टर १९ आणि सेक्टर ३५ कडून सेक्टर ३० मार्गे मुर्बी खाडीकडे जाणारे मोठे नाले आहेत. या नाल्यात पानवेली मोठ्या प्रमाणात वाढली होती. पालिकेने मे महिन्यात पोकलेन लावून नाल्याची साफसफाई केल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
------------------------------------
ज्या एजन्सीची नियुक्ती केली होती, त्यांच्याकडून कामे पूर्ण झालेली नाही. सध्या अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून घेण्यात येत आहेत.
- वैभव विधाते, अधिकारी, पनवेल महापालिका