क्लस्टरचा सात ठिकाणी श्रीगणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्लस्टरचा सात ठिकाणी श्रीगणेशा
क्लस्टरचा सात ठिकाणी श्रीगणेशा

क्लस्टरचा सात ठिकाणी श्रीगणेशा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : धोकादायक, अनधिकृत बांधकामांच्या पुनर्विकासासाठी मिरा-भाईंदर महापालिकेकडून क्लस्टर योजनेची सर्वप्रथम सात ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे. येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. शहरात एकंदर २४ ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. त्यापैकी प्राधान्याने सात ठिकाणी योजना सुरू करण्यास आयुक्तांनी नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.

मिरा, भाईंदर शहरातील धोकादायक, मोडकळीस आलेल्या इमारती, अनधिकृत चाळी, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना मंजूर झाली आहे. त्याचे आराखडे महापालिकेने नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले आहेत. आता २४ पैकी भाईंदर पश्चिम येथील दोन ठिकाणांसह सात ठिकाणी ही योजना प्रत्यक्षपणे सुरू करण्यास आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकतीच मान्यता दिली. येत्या आठ दिवसांत याठिकाणी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षण होणाऱ्या या सातही ठिकाणी बहुतांश करून अनधिकृत चाळी, तसेच झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी क्लस्टर योजना यशस्वी होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

असे होणार सर्वेक्षण
सर्वप्रथम सातही ठिकाणांचे ड्रोनमार्फत हवाई सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या घरांची मोजमापे, रहिवाशांची संख्या व त्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे एकंदर बांधकाम क्षेत्रफळ, इमारतींची पात्रता, तसेच पात्र लाभार्थी आदी माहिती गोळा केली जाणार आहे. यासाठी सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

हरकतींसाठी सहायक आयुक्तांकडून सुनावणी
पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करून त्यावर ३० दिवसांत हरकती सूचना मागवण्यात येतील. हरकती व सूचनांवर प्राधिकृत सहायक आयुक्तांद्वारे सुनावणी घेऊन लाभार्थ्यांची यादी पुन्हा प्रसिद्ध केली जाईल. त्या यादीवरही कोणाला आक्षेप असतील तर त्याची सुनावणी क्लस्टरसाठी नियुक्त उपायुक्तांकडून घेतली जाईल.

राज्य सरकारने क्लस्टरच्या सर्वेक्षणासाठी दहा कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. सर्वेक्षणाच्या कामातून प्रशासनाकडे डाटाबेस तयार होणार आहे. त्याच्या आधारे क्लस्टरची निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.
- मारुती गायकवाड,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

शहरातील क्लस्टरची ठिकाणे
परिसर क्षेत्र (हेक्टरमध्ये)
माशाचा पाडा १५.६६
मांडवी पाडा १९.४७
दाचकूल पाडा २७.७४
महाजन वाडी १०.४४
पेणकर पाडा २७.७४
साठ फुटी रस्ता २९.३८
आंबेडकर नगर ४.४९