टाटा मेमोरियलमध्ये प्रोटॉन थेरपी

टाटा मेमोरियलमध्ये प्रोटॉन थेरपी

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : टाटा मेमोरियल खारघर येथे बहुप्रतीक्षित प्रोटॉन बीम थेरपीसह कर्करोगावरील उपचार आता पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत. प्रदीर्घ काळापासून तयार झालेल्या या केंद्राचे उद्‍घाटन मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या उपचारांसाठी परदेशात कोट्यवधी रुपये खर्च करावे लागायचे; मात्र आता देशवासीयांना टाटामध्ये सवलतीच्या दरात ही सुविधा मिळणार आहे. अशी सुविधा देणारे टाटा रुग्णालय हे देशातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरल्याचे सांगितले जात आहे.

सध्या कर्करोगाच्या रुग्णांना रेडिएशन थेरपी दिली जाते, पण या प्रक्रियेत रुग्णाच्या कर्करोगाच्या पेशींबरोबरच चांगल्या पेशीही नष्ट होतात; तर प्रोटॉन थेरपीने केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जाऊ शकतात. प्रोटॉन थेरपी हे कर्करोगाच्या उपचारांसाठी रेडिओथेरपीमधील सर्वांत आधुनिक तंत्र आहे. या थेरपीनुसार आधी मुलांवर उपचार केले जातील, असे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. यानंतर या थेरपीच्या उपचारांचा प्रौढांवर अभ्यास केला जाईल. या थेरपीसाठी केंद्रात तीन बीम रूम करण्यात आल्याचेही डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. तिन्ही खोल्या कार्यान्वित झाल्यामुळे येथे एका वेळी तीन रुग्णांना प्रोटॉन थेरपी दिली जाऊ शकते. प्रत्येक बीम रूमची किंमत ३० ते ४० कोटी रुपये आहे.
.................

फक्त २ मिनिटांचे रेडिएशन
प्रोटॉन थेरपी प्रक्रियेस रुग्णावर अंदाजे २० मिनिटे लागतील. दरम्यान, रुग्णाला फक्त २ मिनिटांसाठी रेडिएशन बीम दिले जाईल, पण बीम कोणत्या पद्धतीत द्यायचा आहे यासाठी रुग्णाला त्या दिशेने आणण्यासाठी सुमारे १० ते १५ मिनिटे लागतील. काही प्रकरणांमध्ये दोन रुग्णांमधील मध्यांतर वेळ ३० मिनिटांपर्यंत असू शकतो. पहिला रुग्णाचे उपचार झाल्यानंतर दुसरा रुग्ण उपचारांसाठी तयार होऊ शकतो, एवढाच वेळ या प्रक्रियेत लागतो.
.................
ऑनलाईन अहवाल
प्रोटॉन थेरपीचा कोर्स सुमारे ३० ते ४० दिवसांचा असतो. ट्युमरच्या आधारावर कोर्सचा कालावधी निश्चित केला जाईल. थेरपीने ट्युमरचा आकार किती कमी झाला आहे, या सर्वांचा अहवाल डॉक्टरांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
---
दरवर्षी ८०० रुग्णांना प्रोटॉन थेरपी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले. एवढेच नाही, तर या उपचारांत मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रोटॉन बीम थेरपीतून दरवर्षी ८०० कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातील. परदेशातील उपचारांचा खर्च १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो, पण टाटा रुग्णालयात ६० टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. यामध्ये प्रथम मुलांना प्राधान्य दिले जाईल. उर्वरित ४० टक्के रुग्णांवरही सवलतीच्या दरात उपचार केले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com