बॅनर लावून कोणी खासदार होत नाही

बॅनर लावून कोणी खासदार होत नाही

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी खासदार’ असा उल्लेख असणारे बॅनर कल्याण लोकसभा मतदारसंघात झळकले होते. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इच्छा कोणीही प्रकट करू शकतो. बॅनर लागले म्हणजे खासदार होत नाही. ‘भावी मुख्यमंत्री’ असेही बॅनर यापूर्वी लागले आहेत, पण काही झाले का? असे म्हणत माजी आमदार सुभाष भोईर यांचा बॅनरवरून समाचार घेतानाच त्यांनी महाविकास आघाडीतील इच्छुक नेत्यांचीही फिरकी घेतली.
कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील पाटीदार भवन सभागृहात कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची शनिवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात माझे काम असून त्या जोरावर लोक माझा विचार करतील, असे सूतोवाच केले आहे.
‘भावी खासदार’ या सुभाष भोईर यांच्या बॅनरवरून बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे. स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. विरोधकांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही. पहिल्या निवडणुकीत मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखांच्या फरकाने जिंकलोय. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय, पण कोणीही इच्छा प्रकट केली, कोणी बॅनर लावले म्हणून खासदार होत नाही.

टीका करा; पण माझे उत्तर कामातून असेल
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना माझ्यावर टीका करा, माझं उत्तर कामातून असेल. आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करतात, अशी टीका केली.


‘त्या’ जागी शिवसेनाच लढणार
भाजपकडून कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबत खासदार शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले, त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभानिहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com