सौंदर्य वाढविणाऱ्या कळवा खाडीचे ‘पर्यावरण’ धोक्यात

सौंदर्य वाढविणाऱ्या कळवा खाडीचे ‘पर्यावरण’ धोक्यात

किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. ४ : एकेकाळी तिवरांच्या सौंदर्याने नटलेल्या आणि नागमोडी वाहणारी ठाणे खाडी ही शहराच्या सौंदर्यांत भरत टाकत असे, पण कळवा येथे खाडीला सध्या बेकायदा झोपड्या आणि साचलेल्या कचऱ्याचा विळखा पडला आहे. राडारोड्याने खाडीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच तिवरांच्या झाडांची कत्तल करून खाडीपात्रात भूमाफियांनी बेकायदा झोपड्या वसविल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजूंनी कळवा खाडीचा प्रवाहच खुंटला आहे. परिणामी कळवा खाडीपात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त करत यावर कारवाईची मागणी केली आहे.
सध्या कळवा खाडी परिसर बकाल होत आहे. कळवा, विटावा परिसरात खाडी किनारी बांधलेल्या बेकायदा झोपड्यांत राहणाऱ्या नागरिकांनी खाडीत टाकलेल्या कचरा, सांडपाणी यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम तिवारांवर होत आहे. तसेच खाडीचे पाणी काळे झाले आहे. काही ठिकाणी पाण्यावर तेलासारखे तवंग दिसत आहेत. त्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. तिवरांच्या सतत तोडीमुळे खाडी किनारा सपाट होत चालला आहे. त्यामुळे पावसाळ्यात थेट पुराचे पाणी खाडी किनारी असलेल्या सायबानगर व जानकीनगर परिसरात, तर विटावा परिसरातील सूर्यनगर परिसरात शिरते. त्यामुळे पूर आल्यावर चाळीतील अनेक कुटुंबांचे दरवर्षी नुकसान होते.

जीवसृष्टी धोक्यात
एकीकडे कळवा खाडीच्या कडेला स्वर्गीय नगरसेवक मुकुंद केणी यांनी तयार केलेल्या नक्षत्रवनातून अनेक झाडांची जोपासना होत असताना या उद्यानातून कळवा परिसराचे सौंदर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण खाडीकिनारी टाकलेल्या कचरा आणि तिवरांच्या कत्तलीमुळे खाडी किनारा भकास होत आहे. खाडीत टाकलेल्या घाणीमुळे मासे, इतर जलचर, पाणपक्षी यांचे प्रमाण कमी झाल्याने विटाव्यातील मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना मासेमारीसाठी लांबपर्यंत भटकावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पर्यावरण धोक्यात येऊन नवे संकट उभे राहील, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

खाडी किनारी झाडांच्या मुळावर नैसर्गिक गाठी असतात. त्यांच्या मुळाशी सिमेंट, केमिकल व सांडपाणी गेल्यावर या गाठींची वाढ खुंटते. त्यामुळे त्यांची वाढ न होता ती झाडे सुकतात. प्रदूषण टाळण्यासाठी खाडीच्या तोंडातून दलदलीतून पाईपलाईनमधून हे पाणी खोल खाडीत सोडल्यास हे प्रदूषण थांबेल.
- चंद्रकांत पष्टे, जीवशास्त्रज्ञ, ठाणे महापालिका

खाडी किनारी झाडांवर प्रदूषणाचा परिणाम दिसत असेल तर यापुढे सांडपाणी किंवा रासायनिक पाणी खाडीत वेगळ्या ठिकाणी वळविण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जातील.
- मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका

खाडीच्या मुखावर प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या बेकायदा झोपड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे खाडीचा नैसर्गिक प्रवाह सुरू होऊन खाडीचे सौंदर्य अबाधित राहील.
- गोपाळ रावराणे, जागरूक नागरिक, कळवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com