महामार्गावर दोन अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर दोन अपघात
महामार्गावर दोन अपघात

महामार्गावर दोन अपघात

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी (ता. ४) दोन अपघात झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. चारोटी उड्डाण पुलावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर टायर फुटून एक टेम्पो उलटला; तर दुसऱ्या अपघातात गुजरातहून मुंबईकडे जाणारा टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकून थेट नदीत कोसळला. या दोन्ही अपघातांतील जखमींवर उपचार सुरू आहेत.
या अपघाताविषयी माहिती अशी, चारोटी उड्डाण पुलावर मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पोलिस अधिकारी इर्शाद सय्यद व कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. जखमी चालकास कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दुसऱ्या अपघातात गुजरातहून मुंबईकडे जाणारा टेम्पो चारोटी टोल नाक्याच्या पुढे घोळ नदीच्या पुलावरील कठड्यास धडक देत नदीत कोसळला. यात वाहनचालक विकास यादव अडकून पडला होता. हा अपघात रविवारी सकाळी १० च्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पोलिस अधिकारी, तसेच कासा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त चालकाला वाहनातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर वाहतूक थांबवून दोन क्रेनच्या साह्याने पुलाखाली पडलेला टेम्पो वर काढण्यात आला. यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.