
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, ता. ४ ः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या ११ महिन्यांत कक्षाकडून ९६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसाह्य मिळत असल्याने आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्याने जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळे पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख; तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्चमध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख, एप्रिलमध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख; तर मे २०२३ मध्ये विक्रमी १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिले होते. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो, असे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी सांगितले.