दारू साठ्यासह चार आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू साठ्यासह चार आरोपींना अटक
दारू साठ्यासह चार आरोपींना अटक

दारू साठ्यासह चार आरोपींना अटक

sakal_logo
By

मनोर, ता. ४ (बातमीदार) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जव्हार, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यांत चार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून दुचाकीवरून होणारी दमण बनावटीची दारू तस्करी उघडकीस आणली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस केलेल्या कारवायांमध्ये दमण बनावटीच्या २९६ बल्क लिटर दारूसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवींद्र पाटील (वय ३९, डाकीवली, ता. वाडा), प्रवीण फुफाणे (वय ३५, पाथर्डी, ता. जव्हार), संजय थोडी व मनोज शिबू आहिर (दोघेही बोरमाल भेंडीपाडा, कोचाई, ता. तलासरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दुचाकीवरून दमण बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस विक्रमगड तालुक्यातील साखरे मलवाडा रस्त्यावरील टेंभोली गावाजवळ, जव्हार शहरातील साकीनाका चौक, जव्हार तालुक्यातील वावर वांगणी रस्त्यावरील सागपाणी गावाजवळ आणि तलासरी तालुक्यातील कोचाई मसानपाडा भागात भरारी पथकाने सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील अधिकारी आणि जवानांनी केली आहे.