
पाणीचोरांविरोधात फौजदारी गुन्हे
विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका परिसरात अनधिकृत नळजोडण्यांबरोबरच विद्युत पंप लावून पाणी चोरी केली जात आहे. या प्रकरणी महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत पाच पाणीचोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पाचशे बेकायदा नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
वसई-विरार महापालिका परिसरात सध्या पाणीटंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. शहरातील अनधिकृत नळजोडण्या आणि चोरीमुळे पाण्याचा तुटवडा भासत आहे. अधिकृत जोडणीधारकांकडून पंप बसवून अनधिकृत पाणी उपसा करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. महापालिकेने आतापर्यंत नऊ प्रभागांतील २९५ ठिकाणी भेटी देत तपासणी केली आहे. यात नऊ ठिकाणी वीजपंप आढळून आले असून ते काढून घेण्यात आले. यापैकी पाच जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून चार जणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेचे उपयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.
बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई
शहरातील एक हजार २३१ अनधिकृत नळजोडण्यांपैकी सुमारे ५०० वर कारवाई करण्यात आली आहे. मुख्य वाहिन्यांवरील जोडण्या हटवण्याचे कामही सुरू आहे. दुसरीकडे वीजपंपांमुळे होणाऱ्या बेसुमार पाणी उपशामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला ग्रहण लागले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात, अधिकृत नळजोडण्यांना वीजपंप जोडून अवैध पाणीउपसा सुरू असल्याचे दिसून आले आहे.