
खासदार क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
खासदार क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः ईशान्य मुंबईमध्ये रविवारी (ता. ४) सकाळी ‘खासदार क्रीडा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांगांसह शेकडो नागरिकांनी धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेने प्रेरित होऊन खासदार मनोज कोटक यांनी या वर्षीही ‘खासदार क्रीडा महोत्सव’ आयोजित केला आहे. ज्यामध्ये हजारो क्रीडाप्रेमी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. या वेळची मॅरेथॉन स्पर्धा पवईतील पवार वाडी, गणेश विसर्जन घाट, पवई प्लाझा, हिरानंदानी, डी-मार्ट, हेरिटेज गार्डन, वाधवा सर्व्हिस रोडमार्गे सॉलिटेअर, पवई पोलिस स्टेशन सबवे, पवार वाडी, गणेश विसर्जन घाट येथे संपली. या मॅरेथॉन स्पर्धेत प्रौढ स्पर्धकांसाठी सुमारे पाच किमीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता; तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चित केलेला मार्ग सुमारे तीन किमी इतका कमी करण्यात आला होता. ज्यामध्ये शेकडो धावपटू सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते सर्व धावपटूंना टी-शर्ट, एक पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत धावपटूंच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स, दोरी आणि ड्रमचीही व्यवस्था करण्यात आली होती.