किनारपट्टीला कांदळवनांचे संरक्षण

किनारपट्टीला कांदळवनांचे संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : कांदळवनांचे अनेक फायदे असल्‍याने त्‍याच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. केंद्रशासनाने अमृत धरोहर आणि (मिष्‍टी) खारफुटीच्या किनाऱ्यावरील अधिवास आणि उपजीविकेचे साधन निर्मिती उपक्रम आयोजित केला आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी कांदळाच्या (खारफुटी) रोपांची लागवडीला सुरुवात झाली. जिल्ह्यात विविध प्रकारच्या खारफुटीच्या ५० हजार वृक्षांची प्रत्यक्ष आणि १० लाखांच्या आसपास सीडबॉलद्वारे लागवड करण्यात येणार आहे.
वाढत्या तापमान वाढीने पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. याचे परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसून येत असून रायगडमधील कांदळवने धोक्याच्या कक्षेत आहेत. कांदळवनांना नवसंजीवनी देण्यासाठी एक चळवळ उभी राहत असून त्‍यात लोकसहभाग वाढत आहे. कांदळवन उपजिविका कार्यक्रमातून अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन, पेण, उरण या तालुक्यातील अनेकांना रोजगाराची साधने निर्माण झाली आहेत. कधी औद्योगिकरण, तर कधी रहिवासासाठी कांदळवनांची तोड केली जाते. यावर ‘दैनिक सकाळ’ ने सातत्याने आवाज उठवला असून जे नागरिक कांदळवनाने बाधित झाले आहेत, त्यांच्या उपजिवीकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. कांदळवनांचा तटीय पर्यावरणात महत्त्वाचे योगदान असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असून कांदळवन संवर्धन मोहिमेत ‘सकाळ’नेही सक्रिय सहभाग नोंदवला.


रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्र
विभाग / राखीव / संरक्षित / अवर्गीकृत/ एकूण /
वन / १२७८.३०/१५४.०८/१३१.८५/१५६४.२३
महसूल / ७.१८/१८.९४/२.५८/२८.७०/
विकास महामंडळ/०/०/०//०
खासगी वने / १२७.६४/०.००/०.००/ १२७.६४
कांदळवन /१४.५४/०.००/०.००/१४.५४


कांदळवन संवर्धनासाठी योजना
किनारपट्टीचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणूनच कांदळवनांच्या रक्षणाकरिता राज्‍य सरकारकडून अनेक नावीन्यपूर्ण कामे हाती घेतली आहेत. ज्यामध्ये स्वतंत्र कांदळवन कक्ष आणि बरोबरीने कांदळवन प्रतिष्ठानची स्थापना करून स्थानिक सहभागातून अनेक शाश्वत उपजीविका जसे खेकडे पालन, जिताडा पालन, शोभीवंत मासे पालन, कांदळवन निसर्ग पर्यटन, या प्रकल्पांच्या माध्यमातून किनारी भागातील रहिवाशांसाठी रोजगार निर्मिती होऊ लागली आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. या शिवाय कांदळवन स्वच्छता मोहीम कांदळवनांमधील तोड किंवा अनधिकृत बांधकामे काढणे, कांदळरोपांची लागवड, कांदळवनांच्या विविध पैलूंवर संशोधन, जनजागृती उपक्रम कांदळवन कक्ष वनविभागामार्फत राबवल्या जात आहेत.

अधिसूचित केलेल्या क्षेत्रावर ताबा नाही
रायगड जिल्ह्यात उरण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या नगरपालिकांमध्ये डंम्पिग ग्राउंडच नाही. त्याचबरोबर नगरपालिकांलगत ग्रामपंचायतींमध्येही घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही. यामुळे कचरा थेट खाडी किनारी असलेल्या कांदळवनांमध्ये टाकला जातो. विविध कारणाखाली अतिक्रमण झालेली ८ हजार ८४३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी वनविभागाला सूचित केली आहे. यापैकी साधारण ३०० हेक्टर जमिनीवर कचरा टाकण्यात आला आहे. ही सूचित केलेली जागा अद्यापही वनविभागाला ताब्यात घेता आलेली नाही.

औद्योगिककरण कांदळवनाच्या मुळावर
धरमतर खाडी, थळ समुद्र किनारा या भागातील कारखानदारीमुळे कांदळवने नष्‍ट होत आहे. ही कांदळवने नैसर्गिकरीत्‍या वाढली होती. याचबरोबर धेरंड-शहापूर परिसरातील नैसर्गिक कांदळवानांचे

व्यवस्थित संवर्धन झालेले नाही. ही कांदळवने समुद्राच्या लाटा थोपवू न शकल्याने शेतकऱ्यांची पिकती भातशेती नापिक झाली आहे.

कांदळवनांचा श्वास गुदमरतोय
रस्त्यालगतच्या मोक्याच्या जमिनीवरील कांदळवने नष्‍ट करण्यासाठी जाणूनबुजून घनकचरा टाकला जातो. अलिबाग-कुरुळ मार्गावर काही हेक्टर जमिनीवर भराव, कचरा टाकून कांदळवने नष्‍ट करण्यात आली आहेत. अशीच स्थिती जेएसडब्ल्यू ते पेण मार्गावर आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत असून जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनाचा श्वास गुदमरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com