उन्हाच्या झळांमुळे रोपलागवड लांबणीवर

उन्हाच्या झळांमुळे रोपलागवड लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ५ ः गेल्या वर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लाखो झाडे लावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने वृक्षारोपणाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. जून महिन्याचे पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप शहरात पाऊस न पडल्यामुळे महापालिकेने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना ब्रेक दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे पावसाचे आगमन लांबणीवर गेले आहे. अशा परिस्थितीत लावलेली झाडे उन्हामुळे करपून जाऊ नयेत म्हणून महापालिका पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
नवी मुंबई महापालिकेने याआधी २०२१ या वर्षात शहरात एक लाखाहून अधिक रोपांची लागवड केली. याशिवाय मोरबे धरण प्रकल्पस्थळी आधीच्या एक लाख रोपांमध्ये ४० हजार रोपांची भर घालण्यात आली. याव्यतिरिक्त शहरात इतर ठिकाणी २० हजारांहून अधिक वृक्षलागवड केली आहे. २०२२ मध्येही हाच वेग कायम राखत शहरात ७ ठिकाणी १ लाख ४ हजारपेक्षा अधिक रोपांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली. निसर्ग उद्यानातील मियावाकी शहरी जंगलात आधीच्या ४० हजार रोपांत आणखी २० हजार देशी प्रजातींच्या रोपांची भर घालण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी ३० हजार रोपांची लागवड करण्यात आली. मोरबे धरण प्रकल्पस्थळीही ४० हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यंदा जून महिना सुरू होऊन आठवडा होत आल्यानंतरही पावसाळा सुरू न झाल्यामुळे महापालिकेने वृक्ष लागवडीच्या कामाला पूर्णविराम दिला आहे.
---------------------------------
पावसाळ्यातच रोपलागवड गरजेची
पाऊस पडल्यानंतर जमिनीची उष्णता कमी होत असते. जमिनीत पाण्यामुळे ओलावा निर्माण होतो. अशा वेळेस वृक्षारोपण केले की त्या मातीच्या ओलाव्यामुळे झाडाची मुळे जोर धरतात. ती वाढतात; परंतु उन्हाळ्यात झाडांना वेळेवर पाणी न मिळाल्यास झाडे मरण्याचा धोका अधिक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ आबा रणवरे यांनी व्यक्त केले आहे.
---------------------------------------------
पावसाळा सुरू झाला नसल्याने महापालिकेतर्फे केले जाणारे रोप लागवडीचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर रोप लागवडीचे कार्यक्रम सुरू केले जातील.
- दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग
------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com