
पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यात`सेव्ह अर्थ रन -२०२३'' मॅरेथॉनचे आयोजन !
ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : पर्यावरण दिनाचे औचित्य साधित ‘सेव्ह अर्थ मॅरेथॉन’ व ‘हेल्थ अँड वेलनेस इको सिस्टीम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेव्ह अर्थ रन -२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (५ जून) सकाळी ७ ते ९ या वेळेत डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वेळी मॅरेथॉनमधील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले; तर ५० स्पर्धकांना ट्रॉफी आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सोमवारी सकाळी ‘सेव्ह अर्थ मॅरेथॉन’ व ‘हेल्थ अँड वेलनेस इको सिस्टीम’ या सामाजिक संस्थांचे संस्थापक सिद्धार्थ नगराळे व रोटरी क्लब ठाणे नॉर्थ एण्ड प्रेसिडेंट संदीप पहरिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली. मॅरेथॉनमध्ये शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला. जागतिक पर्यावरण दिनाच्या ‘सेव्ह अर्थ रन -२०२३’ मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम पारितोषिक गायत्री शिंदे, द्वितीय-ओम प्रभू , तृतीय-गौरव आर्या यांनी पारितोषिके पटकावली. या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणास समाजसेवक रमेश आंब्रे उपस्थित होते; तर उपस्थित रोटरी क्लब नॉर्थ एंडचे अध्यक्ष संदीप पहारिया, साहस फाऊंडेशनचे सभासद आदेश नगराळे, सुमित, दीपनयन, आरव, सोहम, सतीश मराठे, प्रांजल मराठे, शरद कलावंत, गायकवाड तसेच वाहतूक शाखा आणि चितळसर पोलिस ठाणे आदींचे विशेष आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन सुरेश श्रीनिवासन यांनी केले. या कार्यक्रमासाठी ए. रवींद्रन, रमेश अय्यर, भुमा अय्यर यांचे विशेष सहकार्य लाभले.