
लिपिकाच्या निलंबनावरून कर्मचारी संघटना आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्य परिवहन आयुक्तांनी गुरुवारी (ता. १) बोरिवली उपप्रादेशिक परिवहन विभागातील लिपिकावर निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या मुंबई विभागातील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात सोमवारी सकाळी ११ पासून आयुक्तांना भेटण्यासाठी ठाण मांडले होते. दुपारनंतर आंदोलकांची आयुक्तांशी भेट झाल्यानंतर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांपुढे आपला संताप व्यक्त केला. अन्यायकारक निलंबन मागे घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
सोमवारी आयुक्त कार्यालयात संघटना आणि आयुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत बोरिवली उपप्रादेशिक परिवहन विभागातील लिपिक अजिंक्य पाटील यांच्या अन्यायकारक निलंबनावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. याप्रकरणात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आरटीओ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली; तर निलंबनाच्या प्रकरणात परिवहन आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कर्मचारी संघटनेला दिले असल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.