
मांसाहार दरवाढीचा खव्वयांवर भार
वाशी, ता. ६ (बातमीदार)ः खोल समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर शेकडो नौका परतू लागल्या आहेत. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने एकीकडे मासळीच्या दरात वाढ झाली आहे; तर दुसरीकडे चिकनचे दरही वाढल्याने खवय्यांचा हिरमोड होत आहे.
पावसाच्या आगमनाचे संकेत मिळताच खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो नौका किनाऱ्याकडे परतू लागल्या आहेत. त्यामुळे माशांची आवक कमालीची घटली आहे. परिणामी, बाजारात माशांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे मासे तसेच मटणाच्या तुलनेत चिकन किंवा अंडी स्वस्त असल्यामुळे त्याला प्राधान्य दिले जात आहे; मात्र राज्यात चिकनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या चिकनचा दर २६० रुपये किलो आहे. कोंबड्यांची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने कोंबडीचे दर वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतच दरात मोठी वाढ झाली आहे.
--------------------------------------------
चिकनसाठी किलोमागे २६० रुपये
अतिउष्णतेमुळे कोंबड्या मरत असल्याने पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे चिकनचे भाव किलोमागे २६० रुपयांवर गेला आहे. येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.