कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

sakal_logo
By

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानक बाहेर पडल्यावर सर्व सामान्य प्रवाशांना बेशिस्त रिक्षाचालक नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याची दखल घेत कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई मोहीम राबवण्यात आली. यात ६० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली.
कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानक गाठण्यासाठी सर्व सामान्य प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच अनेक रिक्षा रस्त्यातच लावल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रिक्षा चालक वाढीव भाडे घेत असल्याचे तक्रारी वाढ झाल्याने कल्याण पश्चिम वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश बने आणि कल्याण आरटीओच्या विशेष पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर शंभरहून अधिक रिक्षाची तपासणी केली. यात विनापरवाना रिक्षा चालवणारे, फ्रंट सीट, बॅच नसलेले व इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालक अशा ६० हुन अधिक बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात ई चलन मार्फत दंडात्मक कारवाई करत सुमारे एक लाख ६२ हजार ९०० रुपये आकारण्यात आले, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून रिक्षा चालकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, नियमांचे पालन करावे, गणवेश घाला, सोबत रिक्षाचे अधिकृत कागदपत्रे ठेवा आणि आरटीओ आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी कागदपत्रे मागितल्यास त्यांना दाखवून सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
- गिरीश बने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, कल्याण

कल्याण पूर्व भागात दोनशे चालकांची तपासणी
कल्याण पूर्व मध्ये रस्त्यातच रिक्षा थांबून प्रवासी घेणे, गणवेश न घालणे, रिक्षा फिटनेस प्रमाण पत्र न घेणे असे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात आरटीओ आणि कल्याण पूर्व वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. मंगळवारी कल्याण वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यावेळी २०० हुन अधिक रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. यात १२२ दोषी रिक्षा चालकांवर कारवाई करून दोन लाख सात हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.