
ठाणे जिल्हा हादरला! ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ४५ वर्षाच्या नराधमाचं घृणास्पद कृत्य
ठाणे: शहरातील माजिवडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका साडेसहावर्षीय मुलीवर एका ४५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मुंबईच्या माहीम येथून अटक केली.
तसेच आरोपी व्यवसायाने मिस्त्री असून तो बाळकुम परिसरात राहतो. आरोपी पीडितेच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे पीडित मुलीच्या घरी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तेथून पलायन केले.
हे प्रकरण पीडित मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध सुरू करत त्याला मुंबईच्या माहीम या परिसरातून अटक केली. आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.