
शिक्षणाचा खेळखंडोबा !
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ ः राज्यभरातील मराठी शाळांमध्ये नवी मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रमांमुळे नावाजलेला आहे, पण या विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेली दोन वर्षे नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या ९ वी तसेच १० वीच्या शाळांना अजूनही परवानगी मिळालेली नाही; तर कुकशेत गावातील दोन शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने एक दिवसाआड शाळा चालवण्याची नामुष्की महापालिकेवर आली असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
एखाद्या खासगी शाळेलाही लाजवेल अशा स्वरूपाच्या शाळांची उभारणी महापालिकेने केली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्कृष्ट बैठक व्यवस्था, इंटरनेटने सुसज्ज क्लासरूम, प्रशस्त वर्ग आणि स्वच्छ इमारती आदी पायाभूत व्यवस्था नवी मुंबई महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत; मात्र या शाळांमध्ये गरज असणाऱ्या शिक्षकांची पूर्तता अद्याप महापालिकेला करता आलेली नाही. ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना महापालिकेने वेतनवाढ दिलेली नाही; तर कित्येक वर्षे नवीन शिक्षक भरती महापालिकेने काढली नसल्याने शिक्षकांअभावी महापालिकेला एक दिवसाआड शाळांमधील एक तुकडी चालवावी लागत आहे; तर कुकशेत गावातील महापालिकेची शाळा क्रमांक १२० आणि १२१ या शाळांमध्ये सुरू केलेल्या इयत्ता ८ ते १० पर्यंतच्या तुकड्यांना अद्याप शिक्षण मंडळाची परवानगी नसल्याने तीन वर्षांपासून या शाळा विनापरवानगी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
------------------------------------
विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ
- कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक १२२ आणि आडवली-भुतवली शाळा क्रमांक १२३ मध्ये काही वेगळी परिस्थिती नाही. या ठिकाणीसुद्धा शिक्षण मंडळाची परवानगी आणण्यात महापालिकेच्या शिक्षण विभागाला अपयश आल्याने या शाळेतील पुढील वर्षी दहावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐनवेळेला दुसरी शाळा शोधण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
- कुकशेत येथील १२१ क्रमांकाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला परवानगी आलेली नाही. गेल्या वर्षी महापालिकेच्या दहावीच्या शाळेत एकूण ६४ मुले बसली होती, परंतु ऐनवेळेस परवानगी आली नसल्यामुळे मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शेजारच्या एका खासगी शाळेमार्फत दहावीच्या बोर्डाचे फॉर्म भरण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली होती.
-----------------------------------
सीबीएसई शाळांचे भवितव्य अंधारात
राज्यात सीबीएसई शाळा सुरू करणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका ठरली; मात्र आज त्या सीबीएसई शाळांकडेही महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. सीवूड्स येथे महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक पुरवणाऱ्या आकांक्षा या स्वयंसेवी संस्थेचेही गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळाचे वेतन महापालिकेने रखडले आहे. जुलै २०२१ पासून ते २०२३ पर्यंतचे सुमारे ३० लाख ४८ हजार इतके वेतन शिक्षण विभागाने अदा केलेले नाही.
--------------------------------
कोपरखैरणेतील खैरणे परिसरातील सेक्टर ११ ची महापालिका सीबीएसई शाळेत १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. या शाळेत नर्सरी ते सहावीपर्यंत शाळेमध्ये इयत्ता आहे. त्याला शिक्षण देण्यासाठी फक्त पाच शिक्षकांवर जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे आता पालकांनी शाळेतून मुलांना काढण्यास सुरुवात झाली आहे.
- सूरज पाटील, माजी नगरसेवक
------------------------------------
महापालिकेतर्फे चालवण्यात येत असलेल्या शाळांची अवस्था बिकट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडे शिक्षक वाढवण्याची १५ वेळा निवेदने दिली आहेत; मात्र त्यानंतरही जर महापालिका शिक्षक वाढवत नसेल तर लवकरच उपोषणाला बसणार आहे.
- मुनावर पटेल, माजी नगरसेवक
---------------------------------