
परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसमध्ये पत्रकारांना प्रवास मोफत
ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : महापालिकेच्या परिवहन सेवेतील वातानुकूलित बसेस वगळता सर्वसाधारण बसेसमध्ये पत्रकारांना अनेक वर्षांपासून मोफत प्रवास देण्यात येत आहे. दरम्यान ठाणे परिवहनच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वातानुकूलित बसेस समावेश झाल्याने पत्रकारांनाही वातानुकूलित बसेसमध्ये प्रवासाचा प्रस्ताव परिवहन समितीत सादर करण्यात आल्यानंतर त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीत निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत आलेल्या विषयावर समितीच्या बैठकीत ठाणे पोलिसांची थकीत २९ कोटीच्या रकमेच्या वसुलीनंतर देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी (ता. ६) ठाणे परिवहन समितीची बैठक झाली. परिवहन समितीच्या बैठकीत परिवहनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युईटी आणि अन्य देणीबाबत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर परिवहन व्यवस्थापक भालचंद्र यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, ज्या कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी आणि प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, अशा कर्मचारी यांच्या ग्रॅज्युईटी थांबवण्यात येतात. बैठकीत परिवहन सेवेच्या २९ कोटीच्या थकीत पोलिसांच्या रकमेबाबत सभापती विलास जोशी यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सदरची रक्कम वसुलीबाबत प्रयत्न सुरू असून याबाबत पालिका आयुक्त अभिजित बांगरदेखील सकारात्मक असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.